VIDEO : `हार-जीत, खून-खराबा....`, पाहा `सोनचिडिया`चा दमदार ट्रेलर
`हार-जीत, खून-खराबा, बैमानी-बदला, एक झलक चंबल के बागियों की....`
मुंबई : दरोडेखोरांचं विश्व आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्यात होणाऱ्या चकमकी, त्यांच्यासमोर येणारे प्रसंग आणि त्यातून होणारा संघर्ष अशा एकंदर परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या 'सोनचिडिया' या चित्रपटचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
आणिबाणीच्या काळात चंबल या भागातील असणाऱ्या दरोखेखोरांच्या टोळ्यांमध्ये उदभवलेला संघर्ष आणि तेव्हाची परिस्थिती यावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तगडे संवाद, कलाकारांचा अभिनय अशी सुरेख घडी बसली असून, अनेक ओळखीचे चेहरे त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून सर्वांनाच थक्क करत आहेत.
'हार-जीत, खून-खराबा, बैमानी-बदला, एक झलक चंबल के बागियों की....', अशा ओळींसह हा ट्रेलर पोस्ट करण्यात आला आहे. 'सोनचिडिया' हे प्रकरण आहे तरी काय, यावरुन मात्र पडदा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
'डेढ इश्किया', 'उडता पंजाब' अशा दमदार चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या अभिषेक चौबे याने आता 'सोनचिडिया'च्या निमित्ताने नेमका कोणत्या विषयाला हात घातला आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. ८ फेब्रुवारीला हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून खऱ्या अर्थाने एक संघर्ष निकाली निघेल, असंच म्हणावं लागेल.