मुंबई : जनतेचं काम करण्यासाठी जनतेमध्येच जावं लागेल, या विचारावर एक स्वप्न पाहिलं गेलं ते म्हणजे एका सेनेचं.... शिवसेनेचं. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या शिवसेना या पक्षाच्या पक्षप्रमुखांच्या म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'ठाकरे' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधीही न थकणारी, थांबणारी मायानगरी मुंबई थांबवण्यापासून ते याच मुंबईला खडबडून जागं करण्यापर्यंतची ताकद कोणामध्ये होती तर ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच. त्यांच्या याच प्रभावी व्यक्तीमत्वावर अभिजीत पाणसे याने तितक्याच ताकदीचं कथानक रुपेरी पडद्यावर आणल्याचं ट्रेलर पाहता लक्षात येत आहे. 



अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या चालण्याबोलण्यापासून डोळ्यांतील भावांपर्यंत बरेच बारकावे त्याने टीपल्याचं कळत आहे. अभिनेत्री अमृता राव या चित्रपटात मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसत आहे. 


मुंबई, महाराष्ट्र आणि साऱ्या देशातील एक काळच या चित्रपटात साकारण्यात आला असून, त्या माध्यमातून बेळगाव वाद, मोरारजी देसाईंना बाळासाहेबांनी दिलेलं आव्हान, हिंदू- मुस्लिम दंगल, बाबरी मशिद वाद,  भारत पाकिस्तान क्रिकेटपासून सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांचा मुद्दा इथपासून ते इंदिरा गांधी यांच्यासमोर, महाराष्ट्रावर नितांत प्रेम असलं तरीही देशाचं स्थान अढळ आणि सर्वोच्च आहे असं सांगणारे बाळासाहेब अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत.  


पहिला हक्क मराठी माणसाचाच, जनतेचा शब्द शेवटचा याच मूलमंत्रावर ठाकरे यांनी आपली राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने गाजवली. अर्थात बाळासाहेब नावाच्या या वादळाची व्याप्तीत इतकी आहे की ती अवघ्या काही तासांच्या चित्रपटात साकारणं हे खुद्द दिग्दर्शकासाठीही आव्हानात्मकच ठरलं असणार. तेव्हा आता वाघाने फोडलेला हा डरकाळीचा आवाज बॉक्स ऑफिसवरही घुमतो का, याचा निवाडा २५ जानेवारीला होईलच.