सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : How is the Josh...? असं म्हटलं की High Sir.... असा उत्स्फूर्त प्रतिसाद आपोआपच दिला जातो. 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाच्या निमित्ताने हा संवाद प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि चित्रपगृहांपासून ते संसदेपर्यंत सर्वत्र याचेच सूर गुंजले गेले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन भारतीय सैन्यदलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर भाष्य करणारा चित्रपट दिग्दर्शक आदित्य धरने साकारला. या चित्रपटातील अभिनेता विकी कौशलची भूमिका तर गाजलीच. पण, त्यासोबतच आणखी एका अभिनेत्याने सर्वांचच लक्ष वेधलं. ते अभिनेते म्हणजे योगेश सोमण. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या ट्रेलरमधील अवघ्या काही सेकंदांची त्यांची झलक असो किंवा चित्रपटातील वावर असो, मनोहर पर्रिकर #ManoharParrikar यांच्या व्यक्तीरेखेचा आधार घेत महत्त्वाचं पात्र साकारणाऱ्या या अभिनेत्याने रुपेरी पडद्यावर पर्रिकरांचं प्रभावी व्यक्तीमत्वं अतिशय ताकदीने उभं केलं होतं. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर योगेश सोमण यांच्या भूमिकेविषयीही चर्चा होत आहे. अशा या वातावरणात पर्रिकरांना एका वेगळ्या दृष्टीतून पाहणाऱ्या सोमण यांनी त्यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. सोबतच 'उरी'च्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तीरेखेला आणखी जवळून पाहता येण्याची संधी मिळाल्याचा आनंद आणि अभिमान त्यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधताना व्यक्त केला. 


'पर्रिकरांचं साधेपण, त्यांचं राहणीमान तसंच्या तसं दाखवायचं असल्यामुळे चित्रपटतही ते बारकावे जपण्यात आले होते. त्यात मेकअपची किमया पाहून जेव्हा आरशात चेहरा पाहिला तेव्हा एक वेगळीच भावना होती. मुळात पर्रिकराचं व्यक्तीमत्त्व फार आव़डत असल्यामुळे चित्रपटात त्यांची व्यक्तीरेखा साकारणं हा माझ्यासाठी आनंदाचाच भाग होता', असं सोमण म्हणाले. कोणतीही भूमिका साकारण्यासाठी त्यापूर्वी कलाकारांकडून अमुक एका गोष्टीचा अभ्यास करण्यात येतो. पण, 'उरी' साकारताना मात्र काहीच वेगळं करण्याची गरज भासली नाही, कारण ते जसे होते तसेच रुपेरी पडद्यावरही दाखवायचे होते. एक संरक्षण मंत्री म्हणून त्यांची सर्जिकल स्ट्राईकमधील भूमिका आणि एक जबाबदार साक्षीदारच ऑनस्क्रीन साकारण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. 


अशी होती मनोहर पर्रिकर यांच्यासोबतची पहिली भेट 


चित्रपटाच्या निमित्ताने संरक्षण मंत्र्यांची भूमिका साकारणाऱ्या योगेश सोमण यांनी पर्रिकरांची प्रत्यक्ष भेटही घेतली होती. ते गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तेव्हा काही कलाकारांसह सोमण यांनी गोवा कला अकादमीत त्यांची भेट घेतली होती, त्या वेळची आठवणही सोमण यांनी सांगितली. 'पहिल्यांदाच मनोहर पर्रिकर यांना भेटल्यानंतर त्यांचं साधोपण खऱ्या अर्थाने भावलं. आपण एक मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहोत, याबाबतचा शिष्टाचार हा खुद्द पर्रिकरांच्या वागण्यामुळेच काही हात दूर असायचा. जवळीक साधून कोणाशीही संवाद साधण्याची सवय, इतरांचं म्हणणं, त्यांच्या कार्यक्षेत्राविषयीची माहिती ऐकतानाचा त्यांचा वावर या गोष्टी विशेष लक्षवेधी होत्या. पण, त्यांनी आम्हाला दिलेला हा वेळ फक्त आमच्यासाठीच राखीव होता. ते सर्वांशीच अगदी सहजपणे स्वत:ला जोडू पाहायचे', असं योगेश सोमण म्हणाले. 



'उरी...' या चित्रपटातील भूमिकेविषयीची पोचपावती पर्रिकर यांच्याकडून सोमण यांच्यापर्यंत पोहोचली नाही. पण, त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि अनेकांच्याच नजरेत, 'हा माणूस त्यांच्यासारखा (पर्रिकरांसारखा) दिसतो) हे मात्र पोहोचलेलं होतं' ही बाब अधोरेखित केली.