मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटांमुळे अडचणीत आल्याचं स्पष्ट होत आहे. अवघ्या काही दिवसांनीच प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या 'झिरो' या चित्रपटामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 
आनंद एल.राय दिग्दर्शित या चित्रपटातील दृश्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्यामुळे तो आणि खुद्द दिग्दर्शकही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापकीय मंडळ (DSGMC) चे सचिव मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिग्दर्शक आनंद एल. राय आणि अभिनेता शाहरुख खान यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


'झिरो' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहरुख खानने चुकीच्या पद्धतीने किरपान धारण केली आहे. हाच मुद्दा अधोरेखित करत सिरसा यांनी नॉर्थ अवेन्यू  पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


'शीख संगतकडून माझ्याकडे आतापर्यंत बऱ्याच तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये आनंद एल.राय दिग्दर्शित चित्रपटाकडून शीख समुदायाच्या भावना दुखावल्याचं म्हणण्यात आलं आहे. शाहरुखने चित्रपटामद्धेय किरपान चुकीच्या पद्धतीने धारण केली आहे. ज्यामुळे संपूर्ण विश्वातून शीख समुदायाचा रोष त्याने ओढावला आहे. शीख समुदायात नमुद केल्यानुसार फक्त अमृतधारी व्यक्तीच किरपान धारण करु शकतो', असं त्यांनी या तक्रार करत म्हटलं आहे. 


सिरसा यांनी या चित्रपटाचे प्रोमोही तातडीने थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे ज्यामध्ये ही किरपान दिसत आहे. 




किंग खानच्या या चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्य हटवण्याची मागणीही सिरसा यांच्याकडून करण्यात आली असून, तसे न झाल्यास येत्या काळात चित्रपटाचं प्रदर्शन रोकण्यासाठी शीख समुदायाकडून आंदोलनं करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.