`आमच्या गाण्यांचं रिमिक्स वगैरे कराल तर...`, विशाल ददलानीकडून तंबी
त्याने नेमकी कोणाला दिली तंबी?
मुंबई : गेल्या काही काळापासून एखाद्या जुन्या गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन नव्या अंदाजात सादर करण्याचा ट्रेंड कलाविश्वात चांगलाच स्थिरावल्याचं पाहायला मिळत आहे. पण, काही संगीत दिग्दर्शक आणि कलाकार मंडळींना मात्र हा ट्रेंड फारसा रुचलेला नाही. याचा प्रत्यय येत आहे संगीत दिग्दर्शक, विशाल ददलानी याने केल्या एका सोशल मीडिया पोस्टमधून.
विशालने एका सोशल मीडिया पोस्टमधून कोणीही विशाल- शेखर या जोडीने संगीतबद्ध केलेल्या गीतांचं रिमिक्स व्हर्जन सादर केलं कर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद दिली. या पोस्टमध्ये आपल्या गाण्यांचे रिक्रिएटेड व्हर्जन चित्रपटात करण्यात आल्याचं आपल्या निरिक्षणात आल्याचंही त्याने लिहिलं आहे.
ही एक प्रकारची ताकीदच समजा. विशाल - शेखरच्या जोडीने संगीतबद्ध केलेल्या कोणत्याही गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन परवानगीशिवाय सादर करु नका. नाहीतर यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे हे संगीतकारांसाठी आहे. हे अत्यंत खासगी आहे..., असं म्हणत मित्र असाल तरीही चुकीला माफी नाही असाच सूर विशालने आळवला. आता त्याच्या या पोस्टवर नेमक्या कलाविश्वातून कोणत्या प्रतिक्रिया येतात आणि त्यावर विशाल पुढे कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.