मुंबई : जागतिक संगीत विश्वात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या संगीतकार ए.आर. रेहमान यांच्यावर आज सर्व क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या शुभेच्छांमागे कारण आहे ते म्हणजे त्यांच्या वाढदिवसाचं. १९९२ सालापासून त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात करत विविधभाषी चित्रपटांमध्ये आपल्या संगीताची जादू केली. पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुरेख असा मेळ साधत नवी धुन तयार करण्याकडे रेहमान यांचा नेहमीच कल असतो. चला तर मग, जाणून घेऊया संगीत क्षेत्रात आपलं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या रेहमान यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

*६ जानेवारी १९६६ मध्ये तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये रेहमान यांचा जन्म झाला होता. त्यांचं मूळ नाव दिलीप कुमार असं होतं.


*रेहमान नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हापासूनच त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती खालावली. त्यावेळी आपल्या वडिलांची वाद्ये भाड्याने देऊन रेहमान यांनी त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालवला. काही दिवसांनी त्यांच्या आईने या कामात लक्ष घालत रेहमान यांना कामाचं स्वातंत्र्य दिलं. 


*रेहमान यांना संगीताचा वारसा वडिलांकडूनच मिळाला होता. त्यांचे वडील आर.के.शेखर हे तामिळ आणि मल्याळम चित्रपटांना संगीत द्यायचे. खुद्द रेहमानही बालपणापासून उत्कृष्ट की-बोर्ड वाजवायचे. त्यामुळे परिस्थितीनेही खऱ्या अर्थाने त्यांच्यातला संगीतकार घडला आणि पुढे यातच करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.  


*१९९२ साली जाहिरातींना दिलेल्या वेगळ्या संगीतावर प्रभावित होऊन मणिरत्नम यांनी रेहमान यांना ‘रोजा’ या चित्रपटासाठी संगीत देण्याचा आग्रह केला.


*आईच्या आग्रहास्तव रेहमान यांनी ‘रोजा’ या चित्रपटाला संगीत दिलं आणि  पदार्पणातच आपला ठसा या कलाजगतावर उमटवला. ‘रोजा’मध्ये ‘ब्लॅक अँड व्हाईट’ हा संगीताचा प्रकार वापर रेहमान यांनी एक नवा प्रयोग केल्याचं पाहायला मिळालं होतं. 


*वयाच्या २३व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्वीकार करत त्यांनी स्वत:चं नाव अल्लाहरखा रेहमान असं केलं. 


*२००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रेहमान यांना ऑस्कर, गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार मिळाले आहेत.


*आतापर्यंत विविध संकेतस्थळांवर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार रेहमान आपल्या बहुतांश गाण्यांचं ध्वनीमुद्रण रात्रीच करतात. पण, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी त्यांनी हा नियम बदलला होता. सकाळी आवाजात टवटवीतपणा असतो अशी लताजींची धारणा असल्याने त्यांच्यासोबत रेहमान सकाळीच रेकॉर्डिंग करायचे.