मुंबई : बॉलिवूड कलाकारांचा संघर्ष कायमच चाहत्यांसाठी कुतूहलाचा आणि आकर्षणाला विषय. अनेक मुलाखती आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून कलाकारांचा प्रवास उलगडला जातो. पण, कायमच पडद्यामागं असणाऱ्या कलाकारांचा प्रवास मात्र मुख्य प्रवाहापासून दूर असतो. अनेकदा तो इतरांच्या नजरेतही येत नाही. पण, सध्या मात्र अशाच एका पडद्यामागच्या कलाकारानं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सांड की आँख' या चित्रपटाची निर्माती निधी परमार हिनं एका मुलाखतीत अतिशय मोठा खुलासा केला. वयाच्या 37 व्या वर्षी आपण 'एग्ज फ्रिज' केले होते, असं तिनं सांगितलं. आई होण्याची इच्छा तर होती, पण करिअरमध्ये कुठंही मागे न राहता त्यालाच प्राथमिकता देण्याचा निर्णय निधीनं घेतला होता. 


मुंबईत येऊन एका मोठ्या संघर्षाला आपण सामोरे गेलो हे सांगताना आपण जाहिरात आणि टॅलेंट एजंट म्हणून काम पाहिल्याचं निधी म्हणाली. काही वर्षांनीच तिची एका अशा व्यक्तीशी ओळख झाली, ज्या व्यक्तीनं पुढे तिच्याशी लग्न केलं. पुढे आई- वडिलांपासून संपूर्ण समाजापर्यंत सर्वाकडूनच तिला बाळाचा विचार केव्हा करणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला. मला स्वत:ची निर्मिती संस्था सुरु करायची होती, असं म्हणत पुढे जाऊन कुटुंबाची अखेर आपल्याला साथ मिळाल्याचं तिनं सांगितलं. निर्मिती संस्था सुरु झाल्यानंतर निधीनं 'सांड की आँख'ची निर्मिती केली. 


आपण आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे याची जाणीव झाल्यानंतर निधीनं गरोदरपणाचा निर्णय घेतला. वयाच्या 40 व्या वर्षी ती आई झाली, तेही अगदी नैसर्गितरित्या. लॉकडाऊनच्या काळात ही आई, इतरांसाठीही अमृतदायीनी ठरली. ती अमृदायिनी यासाठी, की लॉकडाऊन काळात तिनं स्वत:चं जवळपास 100 लीटर ब्रेस्ट मिल्क तिनं दान करत प्रसूतपूर्व काळापूर्वी जन्मलेल्या बाळांना नवसंजीवनी दिली.



करिअरला मुलाच्याही पुढे का निवडलं असा प्रश्न तिला कायम विचारला गेला, यावर मी स्वत:ला निवडलं म्हणून पुढे जाऊन मी या दोघांना निवडू शकले, असं निधी म्हणाली. तिनं घेतलेला निर्णय आणि त्यानंतर ब्रेस्ट मिल्क दान करण्यासाठी तिनं उचललेलं पाऊल नक्कीच समाजापुढं एक आदर्श प्रस्थापित करुन गेलं आहे.