`माझ्या सोन्यासारख्या भावाला...`, सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसानिमित्त बहिणीची खास पोस्ट
सुशांतच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक खास फोटो पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तिने सुशांतला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन चार वर्षे उलटली आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूला इतका काळ उलटला असला तरी अद्याप त्याचे कुटुंबिय या धक्क्यातून सावरलेले नाही. आज सुशांतच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक खास फोटो पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तिने सुशांतला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
सुशांतची बहिण श्वेता ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. ती अनेकदा सुशांतचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा देत असते. आता श्वेताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तिने त्याचे जुने व्हिडीओ एकत्र करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला सुशांत हा आज माझा वाढदिवस असल्याचे सांगतो आणि त्यानंतर मग त्याचे अनेक व्हिडीओ समोर येतात.
सुशांतच्या बहिणीची पोस्ट
या व्हिडीओला तिने भावनिक कॅप्शन दिले आहे. यावेळी ती म्हणाली, "माझ्या सोन्यासारख्या भावाला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुझ्यावर अगणित प्रेम करते. मला आशा आहे की, तू लाखो लोकांच्या हृदयात आहेस आणि तू त्यांना काहीतरी करण्यासाठी आणि चांगले बनण्यासाठी प्रेरणा देत आहेस. तुझा वारसा कायम पुढे चालत राहिलं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्टार. तू नेहमी चमकत राहा आणि आम्हाला मार्ग दाखव", असे तिने म्हटले आहे. त्याबरोबरच त्याने sushantday, sushantmoon असा हॅशटॅगही दिला आहे.
श्वेता सिंह किर्तीच्या या पोस्टवर सुशांतच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकजण या पोस्टवर सुशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तर काहींनी हार्ट इमोजी शेअर करत मिस यू असे म्हटले आहे.
दरम्यान, सुशांतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी बिहारमध्ये झाला. त्याने अभिनय क्षेत्रातील सुरुवात ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेपासून केली होती. पण तो ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला. या मालिकेमुळेच त्याला खरी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तो काय पो छे, केदारनाथ, एम.एस. धोनी यांसारख्या अनेक चित्रपटात झळकला. पण 14 जून 2020 रोजी त्याने मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला होता.