VIDEO : प्रेमाचा लग्नापर्यंतचा प्रवास, पाहा कपिल शर्माच्या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ
काही दिवसांपूर्वीच कपिलने प्रेयसी गिन्नी छतरथ हिच्याशी लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली.
मुंबई : लग्न... आयुष्यातील एक असं वळण जे बऱ्याच जबाबदाऱ्यांसह सोबत घेऊन येतं ते म्हणजे एक नवा साथीदार आणि त्याची किंवा तिची कधीही न सुटणारी साथ, सहवास. या वळणावरुन जातानाचा प्रत्येक क्षण हा अनेकांसाठीच संस्मरणीय असतो. किंबहुना लग्नाचा दिवसही नेमका कसा खास करता येईल याकडेच अनेकांचं लक्ष असतं. विनोदवीर कपिल शर्माही या अशा परिस्थितीतून गेला.
काही दिवसांपूर्वीच कपिलने प्रेयसी गिन्नी छतरथ हिच्याशी लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. त्याच्या लग्नाच्याच दिवसाचा सुरेख असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचच लक्ष वेधत आहे. खुद्द कपिलनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे.
#kapilginnikishaadi #family #love #blessings #wedding #punjab असे हॅशटॅग जोडत त्याने हा व्हिडिओ शेअर केला. विवाहस्थळापासून ते पाहुणे मंडळींच्या गर्दीपर्यंत प्रत्येक गोष्टीची झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 'मौला मौला...', असे बोल असणारं संथ चालीचं एक गाणं व्हि़डिओमधील दृश्यांना अगदी साजेसं वाटत असून, खरं प्रेम आणि ते आयुष्यभरासाठी सोबत असण्याची भावना या गाण्यातून, व्हिडिओतून व्यक्त होत आहे.
गिन्नी आणि कपिलच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य आणि विधींकडे पाहताना त्यांच्या डोळ्यांमध्ये असणारे भाव बरंच काही सांगत आहेत. अतिशय सुरेखपणे साकारण्यात आलेला कपिलच्या लग्नाच्या व्हिडिओची ही तर एक लगानशी झलक आहे. पण, आता हा संपूर्ण व्हिडिओ कुठे पाहायला मिळतो, हे पाहण्यासाठीच आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.