मुंबई : आयुष्यात कितीही हातपाय मारा, कितीही प्रयत्न करा पण कोणतीही गोष्ट संघर्षाशिवाय तुमच्या वाट्याला येत नाही. मुळात हा संघर्ष कोणालाही चुकलेला नाही. फक्त त्याचं प्रमाण कमीजास्त असतं इतकाच काय तो फरक. हिंदी कलाजगतात अशाच काही कलाकारांच्या संघर्षगाथा आपण आजवर पाहिल्या असतील. मुळात यातून प्रत्येक अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातो. अशीच मोठी शिकवण देऊन जाणारा प्रवास आहे एका लोकप्रिय अभिनेत्याचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जो आज सर्वांच्या आवडीच्या कलाकारांपैकी एक आहे, मोठ्या सेलिब्रिटींमध्ये त्याची उठबस आहे. पण, त्यानं केलेली मेहनत पाहता, त्याच्या सहनशीलतेला खरंच दाद द्यावीशी वाटते.


हा अभिनेता आहे विजय राज. चौकटीबाहरेच्या, आव्हानात्मक तरीही तितक्याच प्रभावी भूमिका साकारणारा हा एक अभिनेता. तुम्हाला ठाऊक नसेल पण, सुरुवातीला काळ तो आणि नवाझुद्दीन एकाच खोलीत राहायचे. (Bollywood Actor Vijay raaz)


ते दिवस हलाखीचेच म्हणावे. कारण, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण म्हणून त्याच्या नशीबी फक्त चहा आणि पार्ले जी बिस्कीट इतकंच येत होतं. ऐपतच नसल्यामुळं पोटची भूकही त्यानं आवरती घेतली होती.


शालेय शिक्षणानंतर या अभिनेत्यानं महाविद्यालयाची वाट धरली. तिथं नाटकांमध्ये सहभागी होणाऱ्यांसोबत त्यानं काम करण्यास सुरुवात केली. एक दिवस आपण मोठा कलाकार होणार हे स्वप्न त्यानं तेव्हापासून उराशी बाळगलं.


याच स्वप्नांचा पाठलाग करत त्यानं मायानगरी मुंबई गाठली. जिथं नसिरुद्दीन शाह यांच्या ओळखीवर बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर त्याला ‘भोपाल एक्स्प्रेस’साठी निवडलं गेलं.  नसिर आणि त्याची भेट एनएसडीची. त्यांच्यामुळंच विजय राज हे नाव 1999 पासून हिंदी कलाजगतात सक्रिय झालं.



2000 मध्ये राम गोपाल वर्माच्या ‘जंगल’नं त्याचं नशिब पालटलं. 'मॉनसून वेडिंग', 'कंपनी', 'पांच', 'रोड', 'युवा', 'डेल्ही बेली' आणि 'स्त्री' यांसारख्या चित्रपटांतून भूमिका साकारत विजय राज हे नाव पाहता पाहता कला जगतामध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण करण्यात कमालीचं यशस्वी ठरलं.