बॉलिवूडच्या खलनायकचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत
बॉलिवूड खलनायक महेश आनंद काळाच्या पडद्याआड गेले आहेत. शनिवारी अंधेरीतील निवास स्थानी ते मृत अवस्थेत आढळून आले.
मुंबई: बॉलिवूड खलनायक महेश आनंद काळाच्या पडद्याआड गेले आहेत. शनिवारी अंधेरीतील निवास स्थानी ते मृत अवस्थेत आढळून आले. पोलिसांच्या सांगण्यानुसार महेश आनंद अनेक वर्षांपासून एकटे राहत असून कित्येक वर्ष ते बेरोजगारीने त्रस्त होते. त्यांचा मृत्यू दोन दिवसांआधी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचे कुजलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी कपूर रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृत्यू नक्की कधी आणि कसा झाल्याची माहिती मिळू शकेल. 1980 ते 1990 दशक गाजवणाऱ्या महेश यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. पण गेल्या काही वर्षभरापासून ते गंभीर आर्थिक संकटांना सामोरे जात होते.
आनंद यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले होते. जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, गोविंदा, संजय दत्त यांसारख्या कलाकारांसोबत 'गंगा जमुना सरस्वती', 'शेहेंशा, मजबूर', 'थानेदार', बेताज बादशहा', 'कूली नं 1', 'विजेता', 'लाल बादशाह', 'आया तूफान', 'बागी और कुरुक्षेत्र', 'प्यार किया नहीं जाता' यांसारख्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली होती. यानंतर तब्बल 15 वर्षांनंतर त्यांनी मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली होती. पहलाज निहलानी यांच्या 'रंगीला राजा' सिनेमात गोविंदा सोबत झळकले होते.