बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर सध्या आगामी 'मैदान' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. याच पार्श्वभूमीवर देत असलेल्या मुलाखतींमध्ये ते आपल्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यावर बोलत आहेत. यादम्यान श्रीदेवीवर बायोपिक बनवण्याची काही शक्यता आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी नकार दिला. "ती फार खासगीत जगणारी व्यक्ती होती. तिचं आयुष्यही खासगीच राहायला हवं. मला वाटत नाही की तिच्यावर बायोपिक येईल. मी जिवंत असेपर्यंत तरी त्यासाठी परवानगी देणार नाही," असं बोनी कपूर म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रादेवीशी लग्न कऱण्याआधी बोनी कपूर विवाहित होते. मोना कपूर यांच्याशी त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. बोनी कपूर आणि मोना यांना अर्जून कपूर आणि अंशुला कपूर अशी दोन मुलं होती. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी 1996 मध्ये लग्न केलं. त्यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. श्रीदेवी  यांचा 2018 मध्ये दुबईत बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. 


एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या मृत्यूवरही भाष्य केलं होतं. "तो नैसर्गिक नव्हे तर अपघाती मृत्यू होता. मी यावर परत बोलेन असं वाटलं नव्हतं. कारण दुबई पोलीस तपास करत असताना मी त्यांच्यासमोर याबद्दल 24 ते 48 तास बोललो होतो. चौकशीनंतर मला त्यांनी क्लीन चीट दिली होती. अधिकाऱ्याने आम्हाला हे करावं लागतंय असं मला सांगितलं होतं. भारतीय मीडियाकडून आमच्यार फार दबाव असल्याचं त्याचं म्हणणं होतं. पण यात काही गडबड नसल्याचं त्यांना समजलं. जो रिपोर्ट आला आहे त्यानुसार, बुडून अपघाताने मृत्यू झाल्याचं स्पष्ट आहे," असं त्यांनी सांगितलं.


सलमान खान-अर्जुनमधील वादावरही भाष्य


"मी पहिली पत्नी मोनापासून वेगळा झालो होतो. पण अर्जुनला अभिनेता व्हायचं आहे हे माझ्या ध्यानी मनीही नव्हतं. सलमान खानने मला फोन करुन, 'बोनी सर, तो अभिनेता होईल. त्याच्यात ती गुणवत्ता आहे' असं म्हटलं होतं. तो अभिनेता होईल याची त्याने खात्री केली," असं बोनी कपूर म्हणाले आहेत.


पुढे त्यांनी सांगितलं की, "सलमान खानने अर्जुनला वजन कमी करायला लावलं. अर्जुनचा प्रश्न असेल तिथे मी सलमान खानला श्रेय देतो. आज त्यांच्याच फार चांगलं नातं नसेल, पण त्याने अर्जुनला सर्वोत्तम दिलं. सलमान खानमुळे तो आज इतका यशस्वी आहे".


दरम्यान त्यांच्यातील वादाचा परिणाम तुमच्या नात्यावर झाला का? असं विचारण्यात आलं असता बोनी कपूर म्हणाले की, "या वादाचा परिणाम सलमान आणि माझ्या नात्यावर झालेला नाही. मी आजही त्याच्यावर तितकंच प्रेम करतो. त्याच्यासारखे मोठ्या मनाचे लोक फार कमी आहेत. आम्ही जेव्हा कधी भेटतो, तेव्हा प्रेमाने भेट होते. तो मला फार आदर देतो आणि माझ्यावर प्रेम करतो".