मुंबई : डोळे मिचकावत अल्पावधीतच इंटरनेट सेन्सेशन ठरलेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर ही लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. प्रिया लवकरच 'श्रीदेवी बंगलो' नावाच्या एका सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे. या सिनेमाचं कथानक बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आयुष्याशी मिळतं-जुळतं असल्याचं सिनेमाच्या टिझरमधून दिसतं. परंतु, हा सिनेमा अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारीत आहे किंवा नाही याचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही. गेल्या वर्षी श्रीदेवी यांचं निधन दुबईतील एका हॉटेलमध्ये झालं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थातच सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर सिनेनिर्माते आणि श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी या सिनेमाला कायदेशीर नोटीस धाडलीय. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत माम्बुली यांनी आपल्याला बोनी कपूर यांच्याकडून नोटीस मिळाल्याचं मान्य केलंय. 


'आम्हाला बोनी कपूर यांच्याकडून गेल्या आठवड्यात एक कायदेशीर नोटीस मिळालीय आणि आम्ही त्याला उत्तर देऊच. माझा सिनेमा हा एक सस्पेन्स थ्रीलर असेल. मी बोनी कपूर यांना हेदेखील सांगितलंय की सिनेमात श्रीदेवी हे सामान्य नाव आहे. माझ्या सिनेमाही एका अभिनेत्रीवर आधारित आहे' असं प्रशांत माम्बुली यांनी आमची सहयोगी वेबसाईट बॉलीवूडलाईफ.कॉमशी बोलताना म्हटलंय. 



या सिनेमाच्या टीझरमधल्या शेवटच्या दृश्यात सिनेमातल्या अभिनेत्रीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचं दाखवण्यात आलंय. सिनेमात प्रिया हिच्याशिवाय अभिनेता प्रियांशू चटर्जी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.