दशक्रिया चित्रपटावर बंदी याचिका फेटाळी, पुरोहितांचा सिनेमाला विरोध
औरंगाबाद खंडपीठानं दशक्रिया चित्रपटावर बंदी घालण्याची याचिका फेटाळल्यानंतर चित्रपटाचा वाद आणखीनच चिघळला. औरंगाबादच्या प्रोझोन या एकमेव मॉलमध्ये हा सिनेमा दाखवण्याला सुरुवात झाल्यानंतर पैठण येथील पुरोहितांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाला जोरदार विरोध केला.
औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठानं दशक्रिया चित्रपटावर बंदी घालण्याची याचिका फेटाळल्यानंतर चित्रपटाचा वाद आणखीनच चिघळला. औरंगाबादच्या प्रोझोन या एकमेव मॉलमध्ये हा सिनेमा दाखवण्याला सुरुवात झाल्यानंतर पैठण येथील पुरोहितांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाला जोरदार विरोध केला.
प्रोझोनमॉलमध्ये घुसून या सिनेमाचा शो बंद पाडला. सुरुवातीला प्रोझोन प्रशासनाने पुरोहितांना शो बंद करण्यास नकार दिला. मात्र पुरोहितांनी आक्रमक धोरण अवलंबून प्रोझोन मॉलमध्ये ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि सुरू झालेला शो बंद पाडला.
मात्र यानंतर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मॉलमध्ये आले आणि त्यांनी सिनेमा गृहाला संरक्षण देत सिनेमा प्रदर्शित करण्याची मागणी प्रोझोनकडे केली. त्यामुळे संतापलेले पुरोहित आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी झाली.
मात्र प्रोझोनकडून कोणत्याही परिस्थितीत हा सिनेमा दाखवला जाणार नसल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर पुरोहितांनी आक्रमक भूमिका सोडून दिली. त्यामुळं न्यायालयाच्या निर्णयानंतरही औरंगाबादमध्ये दशक्रिया प्रदर्शित होऊ शकला नाही.
दशक्रिया चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आज औरंगाबादमध्ये विरोधकांनी प्रोझोन मॉलमधील चित्रपटगृहात शो बंद पाडलाय. बाह्मण संघाच्या आंदोलकांनी आज दुपारी मॉलच्या बाहेर आंदोलन केलंय. आंदोलनानंतर आजचे या मॉलमध्ये होणारे शोज रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान आज सकाळी राष्ट्रीय पुरस्कार विजेता दशक्रिया या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलीय. एका दिवसात अशी याचिका स्वीकारून निकाल देणं अशक्य असल्याचं खंडपीठानं म्हटलंय.
याचिकाकर्त्यांना सुप्रिम कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. शिवाय पैठणच्या ब्राह्मण संघानं ही याचिका दाखल केली होती. आज हा चित्रपट महाराष्ट्रसह देशभरात प्रदर्शित झाला आहे.