भारताआधी `पद्मावती` ब्रिटनमध्ये होणार प्रदर्शित
संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त पद्मावती चित्रपटाचं प्रदर्शन भारतात लांबणीवर पडलं असलं, तरी हा चित्रपट ब्रिटनमध्ये मात्र १ डिसेंबरलाच प्रदर्शित करण्यात येणार आहे.
मुंबई : संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त पद्मावती चित्रपटाचं प्रदर्शन भारतात लांबणीवर पडलं असलं, तरी हा चित्रपट ब्रिटनमध्ये मात्र १ डिसेंबरलाच प्रदर्शित करण्यात येणार आहे.
ब्रिटनमध्ये कात्री नाही
ब्रिटनमध्ये चित्रपट पदर्शनासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या निर्मात्यांनी मिळवल्या आहेत. 'ब्रिटीश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन' या संस्थेनं 'पद्ममावती'ला '१२ ए' हे रेटिंग दिलं आहे.
या रेटिंगमुळे ब्रिटनमध्ये १२ वर्षांवरील माणसाला सोबत घेऊन सर्वांना हा चित्रपट पाहता येणार आहे. विशेष म्हणजे ब्रिटीश बोर्डानं या चित्रपटातल्या एकाही दृश्याला कात्री लावलेली नाही.
राजस्थान, गुजरातमध्ये प्रदर्शित होणार नाही
राजस्थान पाठोपाठ गुजरात राज्यातही संजय लिला भन्साली दिग्दर्शित बहुचर्चित पद्मावती चित्रपट प्रदर्शित करायला राज्य सरकारनं मनाई केली आहे.
पद्मावती चित्रपटातल्या वादग्रस्त दृश्यांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी, गुजरातमध्ये पद्मावतीचं प्रदर्शन होऊ देणार नसल्याचं, मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. चित्रपटासंबंधीचा वाद मिटत नाही तोपर्यंत राज्यभरात चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी असेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.