Cannes 2023 : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या कान्स चित्रपट महोत्सवाची उत्सुकता (Indian Celebrities in cannes) भारतातही पाहायला मिळत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे कान्समध्ये दिसणारी भारतीय कलाकारांची हजेरी. आतापर्यंत बऱ्याच भारतीय सेलिब्रिटींनी 76 व्या कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. इथं प्रत्येक स्क्रीनिंगच्या वेळी कोणा सेलिब्रिटीचा लूक, कोणाचा अनुभव तर, कोणाची उपस्थितीच खुप काही बोलून गेली. कान्समध्ये रविवार गाजवला तो म्हणजे एका युद्धानं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हो. चित्रपटांच्या या दुनियेत एका युद्धाच्या धर्तीवर आंदोलन झालं आणि संपूर्ण जगाच्या नजरा वळल्या. सहसा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य केलं जातं. अनेकदा सेलिब्रिटी मोठ्या धीरानं हे मुद्दे उचलून धरतात तर, काही प्रसंगी आंदोलकच थेट या सोहळ्यापर्यंत येत विषयाचं गांभीर्य पटवून देताना दिसतात. 


कान्सच्या रेड कार्पेटवर 'ती' रक्तबंबाळ झाली? 


कान्सच्या रेड कार्पेटवर जगाच्या पाठीवर विविध कलाक्षेत्रांतील सेलिब्रिटी हजेरी लावत असतानाच एक सौंदर्यवती थाय हाय स्लीट गाऊनमध्ये आली. पाहताक्षणी तिच्या पेहरावाची रंगसंगती सर्वांनाच भावली पण, नंतर लक्षात आलं की ती एक आंदोलक होती. जिनं युक्रेनच्या राष्ट्रध्वजाचे रंग परिधान केले होते. 


रशिया- युक्रेन युद्धाच्या विरोधात तिनं इथं आंदोलन केलं आणि उपस्थितांसह जगातील सर्वच माध्यमांच्या नजरा वळवत ड्रेसमधून एक कॅप्स्यूल बाहेर काढली. सूत्रांच्या माहितीनुसार तिच्या ड्रेसमध्ये बनावट रक्ताची/ तत्सम पदार्थाची कॅप्स्यूल होती. रेड् कार्पेटच्या मधोमत ती उभी राहिली आणि ड्रेसमधून काढलेलं रक्तासारखं दिसणारं द्रव्य स्वत:च्या शरीरावर टाकलं. काही कळायच्या आतच ती त्या खोट्या रक्तानं माखली. 


हेसुद्धा वाचा : Video : 'मला इथे राहायचंच नाहीये'; आधी केस कापले आणि आता असं का म्हणतेय बॉलिवूड अभिनेत्री?


 


तिथं कार्यक्रम व्यवस्थापनासाठी असणाऱ्या मंडळींनी हा सर्व प्रकार पाहताच तातडीनं तिला रेड कार्पेटवरून खाली उतरवलं आणि बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. तिथं असणाऱ्या अनेक माध्यमांनी हा सर्व प्रकार टीपला आणि पाहता पाहता तो संपूर्ण जगात व्हायरल झाला. 




कान्स आणि बरंच काही... 


फ्रेंच दिग्दर्शक जस्ट फिलिपॉट यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या Acide या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी हा गोंधळ माजला. हे असं काहीतरी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षीसुद्धा कान्समध्ये रशियन सैन्याच्या हल्ल्यांता विरोध करत युक्रेनच्या वतीनं एका महिलेनं रेड कार्पेटवरच विवस्त्र होण्यास सुरुवात केली होती. "Stop raping us" असे शब्द तिच्या शरीरावर लिहिण्यात आले होते. दरम्यान, यंदाच्या वर्षीही कान्समध्ये रशियाचे प्रतिनीधी आणि रशियन चित्रपट कंपन्यांवरील बंदी कायम असल्याची माहिती टेलिग्राफनं प्रसिद्ध केली आहे.