अमिताभ बच्चन यांच्या नावाने रजिस्टर्ड कार जप्त; चालवत होता सलमान खान
या लग्जरी कारमागे काय आहे रहस्य?
बंगळुरू : कर्नाटक परिवहन विभागाने रविवारी रात्री बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावावर रजिस्टर्ड असलेली रोल्स रॉयस कार जप्त केली आहे. ही कार चालवणाऱ्या इसमाचं नाव सलमान खान असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. पण नंतर लक्षात आलं की अमिताभ बच्चन यांच्याकडून लग्जरी कार खरेदी केलेल्या बंगळुरूमधील व्यक्तीने अद्याप कारचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी गाडीचे मालक बाबू यांच्याकडून कागदपत्र सादर करण्यास सांगितलं आहे.
रोल्स रॉयसचे सध्याचे मालिक आणि उमराह डेव्हलपर्सचे मालिक बाबू यांनी सांगितलं की, 'मी बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांच्याकडून कार खरेदी केली आहे. ही कार मी त्यांच्याकडून 6 कोटी रूपयांमध्ये खरेदी केली होती. मी जुनं वाहन खरेदी केली आहे. मी रजिस्ट्रेशनसाठी नाव बदलण्यासाठी अर्ज केला. पण काही कारणांमुळे होवू शकलेलं नाही.'
पुढे ते म्हणाले, 'माझ्याकडे दोन रोल्स रॉयल्स कार आहे. माझी मुलगी कारमधून प्रवास करत होती. तेव्हा कार जप्त करण्यात आली. अधिकाऱ्यांनी तिला शहराच्या बाहेरील नेलामंगळा येथे असलेल्या आरटीओ कार्यालयात येण्यास सांगितले आहे. तिने त्यांना घरी सोडण्याची विनंती केली होती.'
परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त नरेंद्र होळकर म्हणाले की, योग्य कागदपत्रांअभावी रोल्स रॉयस कार जप्त करण्यात आली आहे. मालकाने अमिताभ बच्चन यांची स्वाक्षरी असलेले पत्र सादर केले आहे, ज्यात असे म्हटले आहे की वाहन त्याला विकली जात आहे.
रोल्स रॉयस शिवाय अन्य 6 लग्जरी कार देखील जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कर न भरणे, आवश्यक कागदपत्रांचा अभाव आणि विमा यासाठी परिवहन विभागाने बंगळुरूच्या पॉश यूबी सिटी क्षेत्राजवळ एक मोहीम चालवली होती.