जोधपूर : 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये आलेल्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्यामागे असणारी संकटं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार राजस्थानातील जोधपूर येथे करण, पांड्या आणि राहुलविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड निर्माता, -दिग्दर्शक करण जोहर याच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात विविध सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळते. याच कार्यक्रमाच्या एका भागात २०१८ च्या डिसेंबर महिन्यातील एका भागात भारतीय क्रिकेट संघातील नव्या जोमाचे आणि सध्या तरुणाईत लोकप्रिय असणारे खेळाडू हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी गप्पांच्या ओघात पांड्या आणि राहुलने काही अशी वक्तव्य केली ज्यामुळे विविध स्तरांतून त्यांचा विरोध केला गेला. 


अश्लील आणि बेजबाबदार शब्दांत महिलांविषयी केल्या गेलेल्या वक्तव्यामुळे राहुल आणि पांड्या या दोघांनाही बीसीसीआयच्या निलंबनाच्या निर्णयाचाही सामना करावा लागला होता. ज्यानंतर त्यांच्यावरील निलंबनही उठवण्यात आलं. पण, तरीही त्यांच्यामागे असणारी संकटांची साखळी काही त्यांचा पाठलाग सोडण्याचं नाव घेत नाही आहे. मुख्य म्हणजे पांड्या आणि राहुलसोबतच आता करण जोहरचं नावही या खटल्यात गोवण्यात आल्यामुळे त्याच्याही अडचणींमध्ये वाढ झाली आहे हे खरं. 



दरम्यान, पांड्या आणि राहुल यांच्यावरील निलंबन तुर्तास उठवण्यात आलं असून, हे दोन्ही खेळाडू त्यांची निवड करण्यात आलेल्या संघातून पुन्हा एकदा आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करत आहेत. तर, करण जोहर त्याच्या आगामी चित्रपटांवर आणि कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत करत आहे.