मुंबई : संगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्ष आणि भरतनाट्यम नर्तिका लीला सॅमसन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. चेन्नई येथे कलाक्षेत्र फाउंडेशनच्या कूथम्बलम प्रेक्षागृहाच्या नुतनीकरणावर ७ कोटी २ लाख रूपयांचा वायफळ खर्च केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सॅमसन या फाऊंडेशनच्या तत्कालीन संचालकपदीही होत्या. २००५ ते २०१२ या काळात त्या या संचालकपदी होत्या.  याच काळात प्रेक्षागृहाच्या नुतनीकरणाचं काम करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसन या पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे. नुतनीकरणासाठी खुली निविदा प्रक्रिया न अवलंबल्यामुळे फाऊंडेशनचा मोठा तोटा झाल्याचा ठपका आहे. नियमबाह्य पद्धतीने कंत्राटदारांनी नेमणूक, मर्जीतील कंत्राटदारांना कामासाठीचं प्राधान्य, अवाजवी खर्च दाखवणे अशा आरोपांमुळे हा वाद प्रकाशझोतात आला आहे. 



प्रेक्षागृह नुतनीकरण वायफळ खर्चाप्रकरणी फक्त लीला सॅमसनच नव्हे तर, फाऊंडेशनच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळत आहे. शिवाय काही अभियंत्यांचाही यात समावेश आहे. दरम्यान, सीबीआयच्या धाडींमध्ये आणि फाऊंडेशनच्या संचालक मंडळाच्या म्हणण्यानुसार समोर येत असलेल्या माहितीतून येत्या काळात लीला सॅमसन यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत.