बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर; करीना, अमृतामागोमाग आणखी दोन बड्या सेलिब्रिटी कोविड Positive
बॉलिवूड कलाकारांमध्येही कोरोनाचा कहर वाढतच असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : एकिकडे कोरोना नियंत्रणात येत असतानाच ओमायक्रॉन नावाच्या नव्या व्हॅरिएंटनं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आणि आता पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. इथे बॉलिवूड कलाकारांमध्येही कोरोनाचा कहर वाढतच असल्याचं पाहायला मिळत आहे.
नुकतंच अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांना कोरोनानं गाठल्याचं लक्षात आलं. ज्यानंतर आता याच सेलिब्रिटी वर्तुळातून आणखी दोन नावं कोरोनाग्रस्त असल्याचं कळत आहे.
अभिनेता संजय कपूरची पत्नी, माहीप कपूर आणि अभिनेता सोहेल खान याची पत्नी सीमा खान यांना कोरोनाची लागण झाली आहे.
माहीपला कोरोनाची सौम्य लक्षणं आढळली असून, तिनं स्वत:ला विलगीकरणात छेवलं असल्याची माहिती संजयनं माध्यमांशी संवाद साधताना दिली.
तर, सीमालाही कोरोनाच्या सौम्य लक्षणांची नोंद असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. करीना आणि अमृताला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली, त्याचवेळी सीमाचाही कोरोना रिपोर्ट आला.
गेल्या आठवड्यामध्ये माहीप, करीना, सीमा आणि अमृता निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीला उपस्थि होत्या.
दरम्यान, करीना आणि अमृताला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पालिकेनं देत त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघ केल्याचंही सांगितलं होतं. शिवाय या सेलिब्रिटींनी काही पार्टींनाही हजेरी लावली होती.
सध्याच्या घडीला करीनाचं घर सील करण्यात आलं आहे. शिवाय ती ज्या व्यक्तींच्या संपर्कात आली होती, त्यांचा शोध घेण्याचं कामही पालिकेकडून करण्यात येत आहे.