`तुम्हाला मेंदू नावाचा प्रकार आहे का?`, `ती` ऑफर ऐकताच संतापली होती `चक दे` फेम अभिनेत्री, म्हणाली `खरंच तुम्ही...`
`चक दे` (Chak De) चित्रपटामुळे अनेक अभिनेत्री रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. यामध्ये विद्या माळवदेचाही (Vidya Malavade) समावेश होता. पण या चित्रपटानंतर तिला बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही.
बॉलिवूड बादशाह शाहरुख खानची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'चक दे' (Chak De) चित्रपटामुळे अनेक अभिनेत्री रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. यामध्ये विद्या माळवदेचाही (Vidya Malavade) समावेश होता. या चित्रपटानंतर ती अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. पण तिला बॉलिवूडमध्ये अपेक्षित भूमिका, यश मिळालं नाही. Bollywood Bubble ला दिलेल्या मुलाखतीत विद्याने आपलं करिअर, तसंच तिला सामोरं जावं लागेले नकार याबद्दल खुलासा केला. आपण फार तरुण, फार वयस्कर, फार गोड, अजिबात गोड नाही, फारच ग्लॅमरस, अजिबात ग्लॅमरस नाही अशा अनेक कारणांमुळे संधी गमावल्याचं विद्याने सांगितलं आहे.
विद्याने यावेळी आपल्याला एकदा चक्क सिद्धार्थ मल्होत्राच्या आईची भूमिका निभावण्याची विचित्र ऑफर आली होती असाही खुलासा केला आहे. विद्याचं वय 51 असून, सिद्धार्थ मल्होत्रा तिच्यापेक्षा फक्त 12 वर्षं लहान आहे. विद्याने तो किस्सा सांगत म्हटलं की, "मला आजही आठवतं एक फोन आला होता, ते फार विचित्र होतं. कास्टिंग करणारे सिद्धार्थ मल्होत्राच्या आईच्या भूमिकेसाठी कास्टिग करत होते. मी कुठे ते सांगणार नाही. पण त्यांनी फोन केल्यानंतर मी म्हटलं खरंच? तुम्ही काय केलं पाहिजे याची तुम्हाला अजिबात कल्पना नाही का? कास्टिंग करणारी ती बहुतेक नवी असिस्टंट किंवा काहीतरी होती. माझं असं झालं होतं की, कस काय? हे काय आहे? मेंदू नेमकं कसं काम करत आहे?".
याच मुलाखतीत विद्याने एकदा दिग्दर्शक इम्तियाज अलीने आपण फारच ग्लॅमरस असल्याने जवळजवळ नाकारलं होतं असा खुलासाही केला. डॉक्टर अरोरा चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तिने सांगितलं की, "जेव्हा इम्तियाज यांची कास्टिंग टीम मला कास्ट करत होती तेव्हा तो सारखा 'ती करु शकत नाही, या भूमिकेसाठी ती फारच ग्लॅमरस आहे' असं म्हणत होता. त्याला एकदम घरगुती दिसणारी बाई हवी होती. त्याला मी या भूमिकेला अजिबात न्याय देऊ शकत नाही असंच वाटत होतं".
आपण कशाप्रकारे इम्तियाज अलीला अखेर मनवलं याबद्दलही विद्याने सांगितलं आहे. "मला आठवतंय की, मुकेश छाबराची टीम कास्टिंग करत होती. तो मला म्हणत होता की, तुझ्याकडे या भूमिकेला साजेसे काही फोटो आहेत का जे मी त्याच्या टीमला दाखवू शकतो. मी फोटो पाठवले असता तो म्हणाला हे नको, मला आणखी हवे आहेत. मी तेव्हा शूटवर होते. मी लवकर पॅक केलं आणि घरी गेले. घरी गेल्यावर मी मोलकरणीला बोलावलं आणि सोबत तिची साडी, ब्लाऊज मागवला. मी ती साडी नेसली, काजळ घातलं आणि केस नीट केले, मी तिला फोटो काढण्यास सांगितलं. मी ते फोटो इम्तियाज अलीला पाठवले आणि मेसेजही केला. त्यात मी लिहिलं की, मी जशी दिसते त्यावरुन माझी भूमिका काढून घेऊ नका. कारण मी वैशालीच्या भूमिकेला न्याय देऊ शकते. तो म्हणाला मला थोडे दिवस दे. काही दिवसांनी मला निवड झाल्याचा फोन आला," असं विद्याने सांगितलं.