Chala Hawa Yeu Dya | भाऊ कदम आणि कुशल बद्रिके लोकलच्या प्रवाशांना `चांगली माणसं` का म्हणतात?
चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे.
मुंबई : चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणू या की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी यावेळी या कलाकारांनी काही भन्नाट किस्से सांगितले, ते चला हवा येऊ द्यामधील प्रत्येक एपिसोड एवढेच मनात साठवण्यासारखे सुखद आहेत. (या बातमीचा व्हीडिओ पाहा शेवटी)
स्टारडम सांभाळणं किती कठीण असतं आज समजायला लागलं - भाऊ कदम
खऱ्या अर्थाने भाऊ कदम ज्याला आता अभिनेता भाऊ कदम म्हटलंच पाहिजे, असा भाऊ म्हणतो, आजही जीवनात स्ट्रगल सुरुच आहे. काही तरी करायचं आहे, याचा विचार केला नव्हता. फक्त काम करायचे होते, एवढंच ठरवलं होतं. एवढं मोठं यश मिळेल असं कधी वाटलं नव्हतं, हा टप्पा कधी आयुष्यात गाठू हा विचार सुद्धा कधी केला नव्हता.आता समजतंय यश सांभाळणं कठीण आहे. कारण लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेचा लोकल प्रवासाचा किस्सा
कुशल बद्रिके सांगतो, डोंबिवलीवरुन लोकलने प्रवास करायचो, लोकं इतकी चांगली आहेत की, ते आम्हाला बसायला जागा द्यायचे. भाऊकडे छोटा आय पॅाड होता. त्यात मी आणि भाऊ आम्ही
एकत्र बसून गाणी एकायचो.
लोकलमध्ये लोकांनी सत्कार केला, तो आयुष्यभर विसरु शकत नाही
लोकलमध्ये एकदा आमचा सत्कार झाला, जो आम्ही कधी ही आयुष्यात विसरु शकत नाही. भजन मंडळींनी आम्हाला एकदा लोकलच्या डब्ब्यात आत बोलवून बसायला जागा दिली आणि टाळ वाजवून आमचा सत्कार केला.
यावर कुशल बद्रिके म्हणाला, ही तिच लोकं आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला उद्या कारने प्रवास करावा लागेल, आणि याच लोकलमधील सर्वसामान्यांनी आम्हाला एवढं डोक्यावर घेतलं की, स्वस्तातली का असेना पण कार घेण्यापर्यंतची आमची परिस्थिती सुधारली.