उदयनराजेंकडून `तान्हाजी`च्या टीमचं कौतुक
बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनमध्ये `तान्हाजी` अव्वल
मुंबई : ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित (Director) 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' (Tanaji : The Unsung Warrior) या सिनेमाचं भरभरून कौतुक होत आहे. शुक्रवारी 10 जानेवारी रोजी 'तान्हाजी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. अजय देवगनच्या या सिनेमाचं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कौतुक केलं आहे. उदयनराजेंनी ट्विट करून 'तान्हाजी' च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडून एक अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.
अजय देवगनचा हा 100 वा सिनेमा आहे. तसेच अजय देवगन आणि काजोल तब्बल 10 वर्षांनंतर एकत्र काम करत आहे. अजय देवगनच्या तोडीला तोड असा अभिनेता सैफ अली खानची भूमिका देखील वाखाण्याजोगी आहे. हा सिनेमा सगळ्याच बाजूंनी खास आहे. असं असताना उदयनराजेंच ट्वीट या सिनेमाच्या संपूर्ण टीमसाठी कौतुकाची थाप ठरली आहे. (Box Office Collection : 'छपाक'ला मागे टाकत पुढे गेला 'तान्हाजी')
उदयनराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,'"तानाजी द अनसंग वॉरीयर" या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी एवढी कमीच आहे त्यांना पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तसेच यापुढे ही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा.' तसेच त्यांनी हे ट्विट अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री काजोल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकरला टॅग केलं आहे.
'तान्हाजी' सिनेमाची 'छपाक' सिनेमासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे. दीपिकाच्या 'छपाक'पेक्षा प्रेक्षकांनी अजय देवगनच्या 'तान्हाजी' सिनेमाला अधिक पसंती मिळत आहे. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील हा आकडा स्पष्ट झाला आहे.