पोपट पिटेकर, प्रोडक्शन एक्झिक्यूटीव्ह , झी 24 तास मुंबई : ग्रामीण भागातील मुलं आज सर्वच क्षेत्रात पाहायला मिळतात. कारण ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांमधील सुप्त गुणांना ओळखून त्या कलागुणांना वाव देताना पाहायला मिळतात. गाव खेड्यातील मुलांमध्ये अनेक कलागुण लपलेले असतात. ते ओळखता यायला हवे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं जावं. अशा मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुलं किती पुढे जाऊ शकतात, याची कल्पनाही आपण करु शकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

   आज ग्रामीण भागातील अनेक मुलं चित्रपट, नाटक, नृत्य, गायन, वादन अशा कला क्षेत्राकडे वळताना दिसतात. ग्रामीण भागात चित्रपट, मालिकांसाठी अनेक चांगले विषय मिळत असल्याने डायरेक्टर देखील ग्रामिण बाज असलेल्या विषयांना हात घालताना दिसत आहेत. असे विषय या क्षेत्रातील जाणकार आणि प्रेक्षकांनाही आवडत आहेत. विषय ग्रामीण असल्याने डायरेक्टरही याच भागातील कलाकारांना संधी देत आहेत. अशा मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी हे कलाकार सर्वस्व पणाला लावून आपली कलाकारी दाखवतात. ग्रामीण भागातील अशा अनेक कलाकारांनी आपली छाप मराठी चित्रपट सृष्टीत पाडलेली आहे. त्यात बालकलाकार देखील मागे नाहीत. अशीच एक बालकलाकार आपले पाय मराठी चित्रपट सृष्टीत रुजवताना पाहायला मिळत आहे.
      
   अहमदनगर मधील पारनेर  तालुक्यातील राजनंगाव मशीद येथील तेशवानी वेताळ. लहानपणापासून शाळेत अनेक कार्यक्रमामध्ये ती उत्साहात सहभागी होत असे. डान्स, नाटक, वक्तृत्व, अन्य सांस्कृतिक कार्यक्रमात ती आपली कला सादर करायची. हेच गुण पाहून शाळेतील शिक्षक तिला प्रोत्साहन करत असत. यासाठी घरातील मंडळीही तिला साथ देत असत. अभिनेता माऊली पुराणे याने तिचे गुण ओळखून तु चित्रपटात का काम करत नाही, असे विचारले. तेशवानीने तेखील मिळाली संधी तर नक्की करेल असा सांगत, संधीची वाट पाहत आपली शाळी सुरु ठेवली. ती सध्या पुण्यातील निगडी येथील श्री स्वामी विवेकानंद विद्यालयात नववी मध्ये शिक्षण घेत आहे. शाळा सुरु असताना एक दिवस अखेर ती संधी चालून आली. मराठी चित्रपट  ‘न्यायाम’ मध्ये काम करण्याच संधी तीला मिळाली. त्या चित्रपटामध्ये मिळालेल्या संधीच तेशवानीनं सोनं केलं. तिचा अभिनय पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले. तिच्या अभिनयाला दाद दिली. पुढे अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी तीला मिळाली.


   झेंडा स्वाभिमानाचा, पतंग यामध्ये प्रमुख भूमिका तेशवानीने साकारली आहे. मन-मनथाचा, धूम धुमधडाका, पॉकेटमनी, पैलवान, बाजार, दहावी, यलो, आयटमगिरी आदी चित्रपटात तीने काम केले आहे. आई मला जगायचंय, भ्रमणध्वनी या शॉर्ट फिल्ममध्ये देखील तिनं प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर तु माझा सांगाती, बे दुणे चार, बोधिवृक्ष या मालिकांमधूनही तेशवानीने आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. होळीचे रंग, निरामय हॉस्पिटल, निम लेडी सौफ यांसारख्या असंख्य जाहिराती तीने केल्या आहेत. सळो की पळो, युगप्रवर्तक छत्रपती शिवराय या नाटकांमध्ये तीने भूमिका साकारल्या आहेत.


   मराठी चित्रपट सृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याची तेशवानीची ईच्छा आहे. ग्रामीण भागात चित्रपट क्षेत्राकडे काहीशा वेगळ्यां नजरेनं पाहिलं जातं. मात्र, तेशवानीचे आई–वडील याला अपवाद ठरले आहेत. आपल्या मुलीच्या कलागुणांना वाव देत तिच्या सर्व ईच्छा पुर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केलाय. लोक काय म्हणतील? लोकांना काय वाटतं, यापेक्षा आपल्याला काय आवडतं याचा विचार करुन तेशवानीच्या पाठीशी उभे राहत, आई संगिता आणि वडील रमेश यांनी तिच्या पंखांना बळ दिले आहे. 
     


   तेशवानीने नुकताच ‘घुमा’ या मराठी चित्रपटामध्ये ‘प्रगती’ची भूमिका साकारली आहे. त्या भूमिकेला साजेसा न्याय तिने दिला आहे. ग्रामिण भागातील शिक्षण व्यवस्था आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं फुटलेलं पेव यावर  ‘घुमा’  भाष्य करतो. तेशवानी सारख्या ग्रामिण भागातील बालकलाकाराच्या कलागुणानां वाव देण्यासाठी 29 सप्टेंबरला ‘घुमा’ हा चित्रपट नक्की पहा.