मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य सुरू आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अशातच लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता असलेल्या चिन्मय मांडलेकरने लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये महाराष्ट्रातील एका पक्षप्रमुखाचा साधेपणा सामान्यांसमोर मांडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिन्मय मांडलेकरने आपल्या फेसबुकवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या साधेपणाबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट हजाराहून अधिक नेटीझन्सनी शेअर केली आहे. चिन्मय मांडलेकर अनेकदा आपली परखड मत स्पष्टपणे व्यक्त करताना दिसतो. चिन्मयने असं प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दलच आपलं मत आणि भेटीदरम्यान आलेला अनुभव फेसबुकवर पोस्ट केला आहे. 



चिन्मय मांडलेकरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'काल नागपूर विमानतळावर फ्लाईट ४० मिनिटं लेट. वेटिंग एरियात बसायला ही जागा नाही. ताटकळत उभा असताना, खंद्यावर सॅक, त्याच्या साईड पॉकेटमध्ये पाण्याची बाटली, साधा शर्ट, पॅन्ट अशी ही व्यक्ति दिसली. आधी वाटलं "आयला! हा माणूस सेम टू सेम प्रकाश आंबेडकरांसारखा दिसतो". पण फोनवर बोलतानाचा त्यांचा आवाज ऐकून कळलं "अरे, प्रकाश आंबेडकरच आहेत." महाराष्ट्राच्या राजकारणातलं गेल्या काही वर्षातला महत्वाचा नेता. पण बरोबर हुजर्‍यांचा लवाजमा नाही, बाऊनर्स वगैरे तर नाहीच नाहीत. कुठलीच वी.अाय.पी ट्रीटमेंट नाही. एअरपोर्टवर बसायला ही जागा नसताना जवळ जवळ ४० मिनिटं ताटकळत उभे होते. अर्थात लोकं भेटत होती, फोटो काढत होती. आमची भेट झाल्यावर मनमोकळ्या गप्पा मारत उभे राहिलो. राजकीय भुमिका पटो न पटो, पण माणसाचा साधेपणा कमाल आहे! आज सामान्य पक्षीय पदाधिकारीदेखील लवाजमा घेतल्याशिवाय फिरत नाहीत, तिथे हा पक्षप्रमुख सामान्यासारखा पाठीवर सॅक मारुन रांगेत उभा राहतो हे विलक्षण आहे. बाय द वे, ज्या एअरपोर्टवर हे झालं त्या एअरपोर्टला यांच्याच आजोबांचं नाव आहे.'


ही पोस्ट चार तासापूर्वी शेअर केली असून या पोस्टला साडे पाच हजाराहून अधिक लोकांनी पाहिली असून 515 लोकांनी या फोटोवर कमेंट केली आहे. तर या पोस्टला हजाराहून अधिक लोकांनी शेअर केली आहे.