अवघे धरू सुपंथ! कोरोनाने पाहण्याचा दृष्टीकोन बदलला
जाहिरातीची जोरदार चर्चा
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे बाप्पाचा उत्सव अतिशय साधेपणाने होणार आहे. दरवर्षी असणारा उत्साह यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत नाही. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत आपल्याला यंदाचा गणेशोत्सव साजरा करायचा आहे. या काळात चितळेंची 'अवघे धरू सुपंथ' ही जाहिरात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या मालिकेने यंदाच्या गणेशोत्सवाचं एक वेगळं रुप आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या अगोदर मंडळातील कार्यकर्ते वर्गणी जमा करण्याच काम करतात. अनेकदा कार्यकर्ते हक्काने वर्गणी जमा करत असतात. अनेकदा आपल्याला असं वाटतं की, मंडळातील हे कार्यकर्ते त्या वर्गणीचा सदुपयोग करतात का? असा सवाल सगळ्यांनाच पडतो. अशावेळी वर्गणी कमी देणं अथवा वर्गणी देणं टाळणं अशा गोष्टी केल्या जातात.
मात्र यंदा मंडळातील या कार्यकर्त्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. कोरोनाच्या काळात अनेक मंडळांनी पुढे येऊन नागरिकांना मदत केली आहे. आपल्या परिसरातील ज्येष्ठ मंडळींना या काळात कार्यकर्त्यांनी मदत केली आहे. यामुळे या मंडळांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. हीच गोष्ट चितळेंच्या या जाहिरातीतून मांडली आहे.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि सिद्धार्थ जाधव यांनी ही उत्तम कलाकृती साकारली आहे. या जाहिरातीला उत्तम प्रतिसाद मिळाला असून अगदी १९ तासापर्यंत म्हणजे आतापर्यंत या व्हिडिओला ८ हजाराहून अधिक लोकांनी पाहिली आहे.