मुंबई: 'आंखे', 'तेजाब', 'क्या कूल हैं हम' अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये लक्षणीय भूमिका बजावणारा अभिनेता चंकी पांडे आता मराठीत पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. उत्तुंग ठाकूर यांची निर्मिती असलेल्या ‘विकून टाक’ या चित्रपटाद्वारे चंकी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने संवाद साधताना चंकी पांडे यांनी म्हटले की, हिंदी ही माझी मदरटंग असली तरी मराठी ही माझी फादरटंग आहे. माझे वडील मुंबईतच जन्मले आणि मीदेखील मुंबईतच लहानाचा मोठा झालो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोदाची उत्तम जाण असलेला अभिनेता म्हणून चंकी पांडे यांची ओळख आहे. हिंदी चित्रपटांप्रमाणे मी बंगाली भाषेतले चित्रपटही केले आहेत. त्याचप्रमाणे 'साहो' या चित्रपटाद्वारे मी तेलुगू भाषेतही पदार्पण केले. तो अनुभवही चांगला होता. मात्र, एखादा मराठी चित्रपट करावा, अशी माझी नेहमीच इच्छा होती. 


मराठी चित्रपटसृष्टी नेहमीच वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखली जाते. आपल्या चित्रपटांमधून याच वेगवेगळ्या प्रयोगांना प्रोत्साहन देणारे निर्माता उत्तुंग ठाकूर ‘विकून टाक’ हा नव्या धाटणीचा चित्रपट घेऊन येत आहेत. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात असलेल्या गरिबीचे वास्तव या चित्रपटाद्वारे मांडले जाईल. मात्र, हा विषय विनोदी ढंगाने सादर करण्यात येणार आहे.


त्यामुळे आता चंकी पांडे या चित्रपटात काय धम्माल करणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. मराठी भाषेला विनोदाची मोठी परंपरा आहे. 'विकून टाक'सारख्या विनोदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने त्या विनोदाची चव चाखता आली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये चित्रीकरण करण्याचा अनुभवही खूप छान होता, असेही चंकी पांडे यांनी सांगितले.