मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ड़ॉ. श्रीराम लागू याचं निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच पक्षातील महत्त्वाच्या व्यक्तींनी डॉ. लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. 'झाले बहु, होतील बहु, पण या सम हाच'अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ.श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले, पण 'पिंजरा' मधील 'मास्तर' आणि 'सिंहासन'मधला 'मंत्री' त्यांनी जबरदस्त पद्धतीने उभा केल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. डॉ.लागू यांनी साकार केलेला 'नटसम्राट' अविस्मरणीय असल्याची आठवणही त्यांनी सांगितली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. लागू हे उत्तम वाचक, लेखक आणि विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. डॉ.लागू यांना महाराष्ट्राची जनता सदैव स्मरणात ठेवील.



१६ नोव्हेंबर १९२७ला त्यांचा जन्म झाला होता. 'सिंहासन', 'पिंजरा', 'मुक्ता' या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. तसंच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. डॉ. लागू यांनी सुमारे १२५हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं आहे. डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीसोबतच  बॉलिवूडमध्ये ही एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आयुष्यात अनेक चढ-उतार आल्यानंतरही त्यांनी खचून न जाता प्रत्येक प्रसंगाला तोंड दिलं. अभिनेत्री दीपा लागू या त्यांच्या पत्नी आहेत. 


पुण्यात डॉ. श्रीराम लागू यांचं शिक्षण झालं. वैद्यकीय महाविद्यालयात असतानाच त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी नाट्य संस्था सुरू केली. त्यांनी कान-नाक-घसा यांच्या शस्त्रक्रियांचं प्रशिक्षण घेतलं आणि पुण्यात कामही केलं. कॅनडा, इंग्लंड येथे ते पुढील शिक्षण घेण्यासाठी गेले. ते वैद्यकीय व्यवसायात असले तरी त्यांना अभिनयाविषयी अधिक आवड होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या डॉक्टरी पेशाला रामराम ठोकत १९६९मध्ये वसंत कानेटकरांच्या 'येथे ओशाळला मृत्यू' या नाटकापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.