‘नशीबवान’चा दिग्दर्शक अमोल गोळेवर हिंदी लेखकाच्या फसवणूकीचा आरोप
अमोल गोळे दिग्दर्शित आणि निर्मित ‘नशीबवान’ सिनेमाचं पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं. भाऊ कदमची मुख्य भूमिका असल्याने या सिनेमाची उत्सुकताही निर्माण झाली. पण आता दिग्दर्शकाने कथेबाबत एका प्रसिद्ध लेखकाची फसवणूक केल्याचा आरोप होतो आहे.
मुंबई : अमोल गोळे दिग्दर्शित आणि निर्मित ‘नशीबवान’ सिनेमाचं पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं. भाऊ कदमची मुख्य भूमिका असल्याने या सिनेमाची उत्सुकताही निर्माण झाली. पण आता दिग्दर्शकाने कथेबाबत एका प्रसिद्ध लेखकाची फसवणूक केल्याचा आरोप होतो आहे.
प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिग्दर्शक अमोल गोळे यांनी प्रसिद्ध हिंदी लेखक उदय प्रकाश यांची फसवणूक केल्याचा स्पष्ट उल्लेख केलाय.
प्रसिद्ध हिंदी लेखक उदय प्रकाश यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहिली असून त्यात त्यांनी या प्रकाराचा उल्लेख केलाय. पण त्यांच्या पोस्टमध्ये अमोल गोळे याचं नाव नाहीये. पण त्यांच्याखाली आलेल्या पोस्टमध्ये काहींनी ‘नशीबवान’ सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्येही उदय प्रकाश यांचा उल्लेखही नाहीये.
अमोल गोळे याचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा असून या सिनेमाची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला. सिनेमॅटोग्राफर अमोल वसंत गोळे या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. कथा - पटकथा - संवाद आणि सिनेमॅटोग्राफी या जबाबदाऱ्याही त्यांनीच पार पाडल्यात.
हा आरोप झाल्यावर दिग्दर्शक अमोल गोळे याची सारवासारव सुरू आहे. त्यासाठी त्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने हा सगळाप्रकार गैरसमजातून झाल्याचे म्हटले आहे.
अमोल गोळे याने याआधी ‘रंगा पतंगा’ सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाला २०१६ चा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता. अमोल गोळे हा हिंदी-मराठी अशा दोन्ही इंडस्ट्रीत काम करतो. त्याने सिनेमटोग्राफर म्हणून ‘रंगा पतंगा’, ‘स्टेनली का डब्बा’, ‘हवा हवाई’, ‘एलिझाबेथ एकादशी’ अशा काही गाजलेल्या सिनेमांसाठी काम केलं आहे. त्याचा ‘नशीबवान’ हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे.
सध्या मराठीत वेगवेगळ्या कथा-कादंब-यांवर सिनेमे केले जात आहेत. कादंब-यांवर सिनेमे करायचे झाल्यास संबंधीत लेखकांकडून रितसर परवानगी घेतली जाते. त्यांना त्याचा मोबदलाही दिला जातो. पण काही लेखकांना अंधारात ठेवून त्यांच्या साहित्याची चोरी केली जात असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. असेच काही आरोप प्रत्यारोप मागेही झाले होते. साहित्य चोरीची ही प्रकरणे आता मराठी सिने इंडस्ट्रीतही वाढत असल्याचे चित्र आहे.