कोरोना लॉकडाऊनदरम्यान प्रेक्षकांना तारणार `रामायण`
`मंगल भवन अमंगल हारी... `
मुंबई : देशभरात कोरोना Corona व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. तब्बल २१ दिवसांसाठी पंतप्रधानांनी देशवासियांना त्यांच्या घरातच राहण्याचं आवाहन केलं. घरातून बाहेर निघण्यावर अनेक प्रतिबंधही लावण्यात आले. या सर्व परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आता प्रत्येकजण क्वारंटाईनचा हा काळ आपल्या परिने व्यतीत करू पाहत आहेत.
कोणी यामध्ये नेटफ्लिक्सचा आधार घेतला आहे, तर कोणी आवडीचे चित्रपट पाहत कलेचा नजराणा या काळात अनुभवण्याला प्राधन्य दिलं आहे. काहींनी तर या काळात रामानंद सागर यांचं रामायण आणि बीआर चोप्रा यांचं महाभारत या दोन अतिशय गाजलेल्या कलाकृती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची मागणी केली आहे.
बुधवारी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी जनतेची मागणी पाहता डीडी नॅशनल वाहिनीवर या दोन्ही मालिकांसाठी स्वामित्त्व हक्क धारकांशी चर्चा सुरु असल्याचं स्पष्ट केलं.
असं झाल्यास पुन्हा एकदा 'मै काल हूँ....' आणि 'मंगल भवन अमंगल हारी... ', अशा ओळी कानांवर पडून या आव्हानाच्या काळात या मालिकाच प्रेक्षकांच्या तारणहार ठरणार असं म्हणायला हरकत नाही.
दरम्यान आपआपल्या घरी असणाऱ्या प्रत्येक देशवासियाच्या, प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी घेण्यासाठी ही मंडळी धडपड आहेत. त्यातच आका कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येकाने जबाबदारीने आणि स्वयंशिस्तीने वागत आपल्या वाट्याला आलेलं हे आव्हान परतवून लावण्यामध्या हातभार लावणं अपेक्षित आहे.