१३ जुलैपासून झी युवा वाहिनीवर एंटरटेनमेंट `फुल्ल ऑन`
सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करून, चित्रीकरण पुन्हा सुरु
मुंबई : कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगभरात बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. खरंतर, संपूर्ण जगच या संकटामुळे थांबलं होतं. सुरळीत जीवन कधी सुरु होईल, हे आजही कुणीही सांगू शकत नाही. या अनिश्चिततेचा सर्वाधिक फटका बसला, तो मनोरंजन विश्वाला! कोविड-१९मुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात, सर्व चित्रपट, मालिका, वेब सिरीज यांचे चित्रीकरण, प्रोडक्शन आणि इतर सगळी कामे बंद करण्यात आली होती.
सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करून, चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यात आलेले असल्यामुळे, येत्या सोमवारपासून, म्हणजेच १३ जुलैपासून 'झी युवा' वाहिनीवरील तुमच्या लाडक्या मालिकांचे नवीन भाग तुम्हाला पाहता येणार आहेत. १९ मार्चपासून स्थगित करण्यात आलेली ही सर्व कामं आता पुन्हा नव्याने सुरु करण्यात आली आहेत.
जवळपास १०० दिवसांच्या कालावधीनंतर, 'डॉक्टर डॉन', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' आणि 'प्रेम पॉयजन पंगा' या तुमच्या आवडत्या मालिकांचे नवेकोरे भाग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
'डॉक्टर डॉन'च्या सेटवर सर्व कलाकार आपली जबाबदारी ओळखून शूटिंग पूर्ण करत आहेत. आपल्यामुळे बाकीच्यांना त्रास होणार नाही याची काळजी ते घेत आहेत. 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेतील आपले सर्वांचे लाडके सई आणि नचिकेत, म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि अभिनेता निखिल दामले, यांचे सेटवरील काही विडिओ आणि फोटो आपण पाहिलेले आहेत.
यावरूनच, सेटवर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे आणि योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे, हे आपण पाहू शकतो. एवढेच नाही, तर सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचे सेटवर काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. प्रत्येकाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी, स्पॉटदादांसह सर्वच टीमला पीपीइ किट्स देण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्ष सीन चित्रित होत असतानाचा काळ वगळता, इतर वेळात कलाकार मास्कचा वापर करत आहेत. सेटवरील प्रत्येकाची सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे, हे ओळखून प्रत्येक व्यक्ती योग्य ती खबरदारी घेत आहे. 'झी युवा' वाहिनी नव्या जोमाने आणि नव्या उत्साहाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेली आहे.