मुंबई : बलात्कार झाल्यानंतर पीडितेला अनेक गोष्टींना, समस्यांना सामोरे जावे लागते. अशाच अनेक गोष्टींवर भाष्य करणारा 'सेक्शन ३७५' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रूपेरी पडद्यावर न झळकलेला अभिनेता अक्षय खन्ना चित्रपटात वकिलाची भूमिका साकरताना दिसणार आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री ऋचा चड्डा देखील चित्रपटात तडफदार भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री मीरा चोप्रा चित्रपटात बलात्कार पीडितेच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना मीरा म्हणाली की, 'बलात्कारा पेक्षा जास्त भयंकर पोलिसांकडून विचारण्यात आलेले प्रश्न असतात. फक्त आपल्याच देशात बलात्कार होत नाहीत तर संपूर्ण देशात अशा घटना होत असतात. जेव्हा पीडित महिला न्याय मागण्यासाठी जाते तेव्हा तिच्या समोर असंख्य अडचणी उभ्या असतात.'


पुढे ती म्हणाली की, ' पोलिसांच्या चौकशी नंतर जेव्हा एखादी पीडित महिला न्यायासाठी न्यायालया समोर न्याय मागण्यासाठी उभी असते तो अनुभव तिच्यासाठी फार कठीण असतो.'  



चित्रपटात ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये काम करणारी एक मुलगी आणि तिच्यावर झालेल्या बलात्काराबाबत अक्षय आणि रिचा एकमेकांविरुद्ध खटला लढताना दिसणार आहेत. अक्षय बलात्कार करणाऱ्या आरोपीचा वकील आहे. तर रिचा पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 


अजय बहल यांनी 'सेक्शन ३७५' चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. तर भूषण कुमार, किशन कुमार, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी 'सेक्शन ३७५' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.