डोंगरवाटांवर निघालेल्या विरुष्काला स्थानिक नागरिक ओळखत नाहीत तेव्हा....
ट्रेक आणि बरंच काही....
मुंबई : क्रिकेट आणि कलाविश्वात चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी कायमच त्यांच्या नात्याच्या माध्यमातून इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. सध्या हे दोघंही विराटच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी एका खास ठिकाणी गेले आहेत. एका खास दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी म्हणून विरुष्का त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत शहरी धकाधकीपासून दूर गेले आहेत.
मुख्य म्हणजे ही सेलिब्रिटी जोडी अशा ठिकाणी गेली आहे, ज्या ठिकाणी त्यांना फारसं कोणी ओळखलंही नाही. ते दोघंही सध्या भूतानध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. खुद्द अनुष्कानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेले फोटो पाहता ही बाब स्पष्ट होत आहे. सध्याच्या घडीला विराटला भारतीय संघातून आराम देण्यात आला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने काही दिवस तो खेळाच्या मैदानापासून दूर आहे.
विराट आणि अनुष्का सध्या यज्या ठिकाणी आहेत, तेथे त्यांना फारसं कोण ओळखंत नाही. याविषयीच सांगतना अनुष्काने लिहिलं, 'आज जवळपास ८.५ किमीचा ट्रेक करत असताना एका गावात थांबलो. तिथे एका गायीच्या बछड्याला चाराही खाऊ घातला. ४ महिन्यांपूर्वीच त्याचा जन्म झाला होता. त्याचवेळी आम्ही थकलो असू, तर घरात काही क्षण विसावू शकतो असं तेथे असणाऱा घरमालक आम्हाला सांगू लागला. त्यांनी आम्हाला चहा पिणार का? असंही विचारलं.....', असं सांगत तिने एक सुंदर अनुभव सर्वांसमोर आणला.
आम्ही ज्या कुटुंबाच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांना काही कल्पनाही नव्हती की आम्ही कोण आहोत. पण, तरीही त्यांनी अतिशय सुरेखपणे त्यांनी आमचं आदरातिथ्य केलं. असं सांहत अनुष्काने एका अशा कुटुंबासोबतच्या काही क्षणांच्या आठवणी सर्वांसमोर आणल्या जेथे एका कुटुंबाने कोणा सेलिब्रिटी जोडीला नव्हे तर दोन ट्रेकर्सना, डोंगरमाथ्यावर जाणाऱ्या वाटसरुंना काही क्षण विसावण्यासाठीचा निवारा देत त्यांचा पाहुणचार केला.
असे अनुभव कायमच स्मरणात राहण्याजोगे असतात असं सांगत अनुष्काने माणुसकीच्या या सुरेख नात्याची बाजू चाहत्यांसमोर ठेवली. विरुष्काचा हा एकंदर अनुभव पाहता साध्या राहणीमानातूनही बरंच काही शिकता येतं हा संदेशही सर्वांपर्यंत पोहोचत आहे.