मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते दादा कोंडके यांचे चित्रपट आजही अनेकांच्या मनात कायम आहेत. चित्रपटातील त्यांच्या डबल मीनिंग कॉमेडीला प्रेक्षकांची खास पसंती मिळत होती. एक वेळ असा होता दादा कोंडकेंचे ९ चित्रपट जवळपास २५ आठवडे चित्रपटगृहात सुरु होते. या रेकॉर्डची गिनीज बुकमध्येही नोंद करण्यात आली आहे. आज दादा कोंडके यांची जयंती आहे. ८ ऑगस्ट १९३२ मध्ये या महान कलाकाराचा जन्म झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादांच्या चित्रपटांची नावं अशी असायची की, सेन्साॉर बोर्डला चित्रपटाला संमती देण्यासाठी अक्षरश: नाकीनऊ यायची. पण तरीही दुहेरी अर्थ असणाऱ्या चित्रपटाच्या टायटलला सेन्सॉर बोर्ड अनेक प्रयत्न करुनही बॅन करु शकलं नाही. या विनोदी कलाकाराने चित्रपटसृष्टीत मोठी कारकिर्द गाजवल्यानंतर १४ मार्च १९९८ मध्ये मुंबईतील दादरमध्ये यांचं निधन झालं.


दादा कोंडके यांचा १९७५ मध्ये आलेला 'पांडू हवालदार' चित्रपट जबरदस्त गाजला. यात दादांनी पांडू हवालदाराची भूमिका साकारली होती. याच चित्रपटानंतर हवालदारांना 'पांडू' म्हणण्यास सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं. याशिवाय 'सोंगाड्या', 'आली अंगावर', 'बोट लाविन तिथे गुदगुल्या' हे चित्रपटही तुफान गाजले. 


दादा कोंडकें 'विच्छा माझी पूरी करा' या नाटकातील भूमिकेसाठीही चांगलेच प्रसिद्ध आहेत. या नाटकाने ११०० हून अधिक प्रयोग केले. या नाटकातून इंदिरा गांधी यांची खिल्ली उडवली गेल्याचंही बोललं जातं.


कृष्णा कोंडके हे दादा कोंडकेंचं खरं नाव. त्यांचं लहानपण काहीसं गुंडागर्दीमध्ये गेलं. एकदा बोलताना दादांनी, ते त्यांच्या भांडणात विट, दगड, बाटल्यांचा वापर करत असल्याचं म्हटलं होतं. 


दादा कोंडके राजकारणातही सक्रिय होते. ते शिवसेनेशी जोडलेले होते. असं म्हटलं जातं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यांनी एका मुलाखतीत बोलताना, मला मुख्यमंत्री होयचं, असं म्हटलं होतं. पण त्यांना अशी संधी मिळाली नाही.