मुंबई : रिऍलिटी शोच्या मंचावरुन प्रेक्षकांची  मनं जिंकल्यानंतर अभिनय विश्वात नावलौकिक मिळवणारी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. घराण्याची परंपरा, प्रतिष्ठा जपत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेत खासगी आयुष्याला प्राधान्य देणारी ही अभिनेत्री कोणी साधीसुधी सेलिब्रिटी नसून, ती एक राजकुमारी आहे बरं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बसला ना धक्का? मोहिना कुमारी सिंह असं नाव असणारी ही अभिनेत्री एका संस्थानची राजकुमारी आहे. तिने फार आधीच म्हणजेच 'डान्स इंडिया डान्स' या कार्यक्रमात आपली खरी ओळख सर्वांसमोर आणली होती. पण, कलाविश्वात मात्र ती इतर सर्व कलाकारांप्रमाणेच मिळूनमिसळून वावरत होती. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या मोहिनाने १४ ऑक्टोबरला हरिद्वार येथे सुयश रावत याला सहजीवनाचं वचन देत त्याच्याशी लग्नगाठ बांधली. 


नुकत्याच लग्नबंधनात अडकलेल्या मोहिनाच्या फॅन पेजवरुन तिच्या विवाहसोहळ्याचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये मोहिना पारंपरिक पद्धतीच्या लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसत आहे. तर, तिचा पतीसुद्धा भरजरी शेरवानीमध्ये तिला शोभून दिसत आहे. 
एकिकडे मोहिनाला तिच्या जीवनातील या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात झाली असतानाच दुसरीकडे लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे तिचा एक महत्त्वाचा निर्णय. 




काही महिन्यांपूर्वीच, साखरपुडा झाल्यानंतर मोहिनाने तिचा एक निर्णय सर्वांसमोर आणला होता. लग्नानंतर आपण, कलाविश्वातून काढता पाय घेणार असल्याचं तिने जाहीर केलं होतं. 



'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयीची माहिती दिली होती. आयुष्याला मिळणारी कलाटणी पाहता सध्याच्या घडीला अंतर्मनाचा आवाज ऐकत आपण हा निर्णय घेत असल्याचं तिने सांगितलं होतं. चर्चांच्या याच वातावरणात या राजकुमारीला शुभेच्छा देण्यास मात्र कोणीही विसरलेलं नाही हे खरं.