अखेर रणवीर-दीपिकाच्या डोक्यावर अक्षता पडल्या; कोंकणी पद्धतीने विवाहबद्ध
गेल्या काही दिवसांपासून या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु होती.
मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे दोघेही बुधवारी संध्याकाळी विवाहबंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपासून या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये आज दोघे कोंकणी पद्धतीने विवाहबद्ध झाले. मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला.
आता गुरुवारी या दोघांचा पुन्हा एकदा सिंधी पद्धतीने विवाह होईल.
'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बी-टाऊनच्या या लोकप्रिय जोडीने त्यांच्या लग्नाचा विमाही उतरवला आहे.
१२ नोव्हेंबर ते १६ नोव्बेंबर या दिवसांसाठीची विमा त्यांनी उतरवला आहे. 'ओरिएंटल इन्श्युरन्स' या कंपनीतर्फे हा विमा उतरवण्यात आल्याचे कळते. ‘ऑल रिस्क पॉलिसी’ अंतर्गत हा विमा घेण्यात आला असून, त्या माध्यमातून विवाहसोहळ्याला संरक्षण देण्यात आले आहे.