बदलायचंय, आता लढायचंय... `छपाक`चा नवा व्हिडिओ चर्चेत
समाजातलं वास्तव...
मुंबई : देशात सध्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. कुठे बलात्कार होत आहेत तर कुठे मुलींच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून त्यांना विद्रुप करण्यात येत आहे. हे प्रकार कुठेतरी थांबायला हवेत म्हणून देशातल्या प्रत्येक नागरिकाने त्यांचा आवाज बुलंद करत होण्याऱ्या अत्याचाराविरूद्ध लढा देण्यासाठी सज्ज होण्याची हिच खरी वेळ आहे. असं चित्र अभिनेत्री दीपिका पादुकोनने शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे.
सध्या दीपिका आणि अभिनेता विक्रांत मॅसी 'छपाक' चित्रपटाच्या प्रमेशनमध्ये व्यस्त आहेत. याच चित्रपटाला अनुसरून तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओमध्ये काही ऍसिड पीडित तरूणी आणि सामान्य माणसं आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
अभिनेत्री दीपिका पादुकोनने खुद्द तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून हा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'बदलायचं आहे आणि आता लढायचं आहे' असं लिहिलं आहे. त्याचप्रमाणे तिने संबंधीत व्यक्तींना देखील टॅग केले आहे.
व्हिडिओची सुरूवात कशाप्रकारे ऍसिड हल्ला केला जातो यावर आहे. त्यानंतर या ऍसिड पीडित तरूणी कशाप्रकारे आपलं आयुष्य स्वच्छंदीपणे जगत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय समाजात आणखी कोणते बदल होणं गरजेचं आहे, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
तर, दीपिका आणि विक्रांत स्टारर 'छपाक' चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. ऍसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्या अव्हानात्मक प्रसंगांभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांचे आहे.