मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २०१२ मध्ये झालेल्या दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणावर प्रकाशझोत टाकणारी 'दिल्ली क्राईम' ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. देशाची मान शरमेनं खाली घालणाऱ्या या कृत्याचा साऱ्या देशातून तीव्र विरोध करण्यात आला होता. अतिशय अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणीही देशभरातून करण्यात आली होती. निर्भया प्रकरणाचं गांभीर्य पाहता हाच मुद्दा लक्षात घेत नेटफ्लिक्सकडून यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दिल्ली क्राईम' या नावाने साकारण्यात आलेल्या या वेब सीरिजचा ट्रेलर पाहता या वेब सीरिजमधून निर्भया बलात्कार प्रकणाच्या तपास प्रक्रियेची झलक पाहता येणार आहे. शेफाली शाह यामध्ये वर्तिका चतुर्वेदी या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून, त्यांच्याच नेतृत्त्वाखाली ही तपास प्रक्रिया पुढे कशी जाते आणि गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी ठरतात का, हे 'दिल्ली क्राईम'मधून उलगडणार आहे. अमानवी आणि क्रूर अशा या कृत्याची निंदा करत तपास प्रक्रियेत जीव ओतणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत शेफाली शाहची एक झलक प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यामुळे ही जबाबदारी आणि संवेदनशील विषय हाताळण्यात नेटफ्लिक्सची वेब सीरिज यशस्वी ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



एक पोलीस अधिकारी आणि एक महिला, एक आई अशा विविध भूमिका निभावणाऱ्या व्यक्तीला अशा प्रसंगाचा सामना करताना, बलात्कार प्रकरणी दोषींचा तपास घेताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात आणि भावनांच्या ओघात वाहत न जाता सत्याचा विजय कसा होईल, गुन्हेगारांना कशी शिक्षा ठोठवता येईल यासाठी असणारे प्रयत्न असं एकंदर दिल्ली क्राईमचं कथानक आहे. इंडो- कॅनेडियन चित्रपट निर्माते- दिग्दर्शक Richie Mehta यांनी 'दिल्ली क्राईम'चं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. ज्यामध्ये आदिल हुसैन, रसिका दुग्गल, राजेश तैलंग हेसुद्धा झळकणार आहेत. Sundance Film Festival 2019 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेली ही वेब सीरिज २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.