आम्हाला इअर फोन लावून वेब सीरिज पाहायला लागली... `कॉलेज रोमान्स`वर हायकोर्टाने ओढले ताशेरे
College Romance : आम्हालाही ही वेब सीरिज इअर फोन लावून पाहायला लागली अशा शब्दात दिल्ली हायकोर्टाने या शोवर ताशेरे ओढले आहेत. यासोबत हायकोर्टाने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना दिलेला आदेश कायम ठेवला आहे
Delhi HC : टीव्हीएफ या ओटीटी प्लॅटफॉर्मची 'कॉलेज रोमान्स' (College Romance) ही लोकप्रिय वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) या वेब सीरिजला अश्लिलतेचा कळस म्हणत याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी करणारे दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्ती स्वर्ना कांता शर्मा (Swarana Kanta Sharma) यांनी जोरदार टीका केली आहे. "मला स्वतःला इअर फोन लावून ही वेब सीरिज बघायला लागली. कारण यामध्ये वापरली गेलेली भाषा लोकांनी ऐकली तर त्यांना धक्का बसेल," असे स्वर्ना कांता म्हणाले.
दिल्ली हायकोर्टाने 'कॉलेज रोमान्स'चे अश्लील म्हणून वर्णन केले आहे. या सीरिजवर कलेल्या एफआयआरच्या आदेशाविरूद्ध दिलेल्या अर्जाची सुनावणी करताना कोर्टाने ताशेरे ओढले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना दिग्दर्शक आणि कॉलेज रोमान्सच्या कलाकारांविरूद्ध एफआयआर आदेश देण्याचे आदेश दिले. याविरुद्ध दिल्ली हायकोर्टात दाद मागण्यात आली होती. मात्र दिल्ली हायकोर्टानेही तोच आदेश कायम ठेवला आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी सिमरप्रीत सिंग आणि अपुर्वा अरोरा यांच्याविरुद्ध कलम 292, 294 नुसार एफआयआर करण्यास सांगितले होते.
कोर्टाने काय म्हटलं?
"आम्हाला या वेब सीरिजचे एपिसोड पाहताना चेंबरमध्ये इअर फोन लावावे लागले. कारण त्याची भाषा इतकी अश्लिल आहे की आजूबाजूच्या लोकांना धक्का बसले. व्यावसायिक किंवा सार्वजनिक जागा असो किंवा आपले घर असो. तिथे भाषेला काही मर्यादा असते. ही भाषा देशातील तरुण आणि इतर नागरिक वापरत नाहीत. ही भाषा आपल्या देशात वारंवार बोलली जाणारी भाषा असू शकत नाही," असे कोर्टानं म्हटलं.
"स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा भाषेला सामान्य लोक आणि प्रेक्षकांना दाखवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. शैक्षणिक संस्थेत तरुण अशी भाषा वापरतात का? या भाषेचा वापर करणे धोकादायक ठरेल. शोमध्ये वापरलेली भाषा सामान्य लोकांची भाषा नाही," असेही न्यायमूर्ती शर्मा म्हणाले. तसेच त्यांनी सरकारला कठोर भूमिका घेण्यास सांगितले आहे.