...म्हणून जान्हवीने घेतला `हा` निर्णय
करिअरविषयी अतिशय गांभीर्याने विचार करणारी जान्हवी...
मुंबई : 'धडक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि हिंदी चित्रपट जगतात पदार्पण करणारी जान्हवी कपूर सध्या काही आगामी प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. जान्हवी येत्या काळात एका ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपटातून झळकणार असून, याच चित्रपटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय तिने घेतला आहे.
आपल्या करिअरविषयी अतिशय गांभीर्याने विचार करणारी जान्हवी, करण जोहरच्या 'तख्त' या चित्रपटासाठी उर्दूचे धडे गिरवत आहे.
'मिड डे'ने सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जान्हवी गेल्या काही महिन्यांपासून उर्दूचं रितसर प्रशिक्षण घेत आहे. उर्दू भाषेची व्याप्ती, त्यातील संज्ञा, उच्चार या सर्व गोष्टींवर ती अधिकाधीक लक्ष देताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या ऐतिहासिक पटाची घोषणा केल्यानंतर जान्हवीने तिच्या इतिहासाच्या अभ्यासावरही भर दिल्याचं कळत आहे.
ऐतिहासिक कालखंडाला अधिक जवळून जाणण्यासाठी ती 'Aurangzeb: The Man and the Myth' हे Audrey Truschke, यांचं आणि 'Storia Do Mogor' हे Niccolao Manucci यांचं पुस्तक वाचत आहे.
उर्दू भाषेचं सौंदर्य आणि शब्दांचे उच्चार पाहता त्यावर मजबूत पकड बसवण्यासाठीच तिने हे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. तख्त या चित्रपटामध्ये बऱ्याच कलाकारांची मांदियाळी असल्यामुळे आता या गर्दीत ती स्वत:चं वेगळेपण सिद्ध करण्यात यशस्वी होते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.