मुंबई : अभिनेत्री-निर्माती अशी आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मुक्ता बर्वेचं 'ढाई अक्षर प्रेम के' हे नवीन नाटक लवकरच रंगमंचावर दाखल होतंय. २३ नोव्हेंबरपासून हे नाटक रंगभूमीवर येतंय. 


'तु भ्रमत आहासी वाया'वर आधारित 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबिका-रसिका निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित 'ढाई अक्षर प्रेम के' हे नाटक २३ डिसेंबर २०१७ पासून रंगभूमीवर येत आहे. निर्मात्या सुजाता मराठे आणि मुक्ता बर्वे यांच्या या नाटकाचा मुहूर्त ९ नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. व.पु.काळे यांच्या 'तु भ्रमत आहासी वाया' या कादंबरीवर आधारित 'ढाई अक्षर प्रेम के' हे नाटक आहे. 


निर्माती मुक्ता बर्वे यांची छापा काटा, रंग नवा, लव्हबर्ड्स, कोडमंत्र या नाटकानंतरची ही पाचवी नाट्यनिर्मिती असणार आहे. मुक्ता बर्वे यांच्याच दीपस्तंभ, CODE मंत्र या नाटकातून अभिनय करणाऱ्या सुजाता मराठे या नाटकाद्वारे प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. 'ढाई अक्षर प्रेम के' नाटकाचे निर्मिती सूत्रधार आहेत दिनू पेडणेकर... 


प्रमुख भूमिका


वपुंच्या ‘तु भ्रमत आहासी वाया’ या कादंबरीचं नाट्यरुपांतर आणि नाट्य दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. दिग्पाल लांजेकर, अजय पुरकर, किरण खोजे, सचिन देशपांडे, अतुल महाजन, तेजस कुलकर्णी, नितीश घारे, अश्विनी कुलकर्णी हे या नाटकात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


बदलत्या नातेसंबंधावर भाष्य...


आजकालच्या धावपळीच्या युगात माणसांवरचा तणाव वाढतो आहे. ताणावांचा परिणाम वैयक्तिक नातेसंबंधांवर होताना दिसत आहे. वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना एकटेपणा पसंत करणारा माणूस हा स्वतंत्र होतो आहे का? एकटा पडतो? हा मानसशास्त्रीय प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. या प्रश्नाचं चिंतन करताना या सगळ्या प्रश्नांचं उत्तर माणसाने स्वतःच्या गरजा नेमक्या किती आणि कोणत्या आहेत त्या ओळखणं आणि स्वतःला आणि नातेसंबंधांना जास्तीत जास्त ‘डोळस’ वेळ देणं ही माणसाच्या सुखी आणि आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली ठरू शकते असा विचार व.पु.काळे मांडतात.


आपल्याकडे नसलेल्या गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घेणे यातूनच सुख सापडू शकते. मोठ्या अर्थाने प्रेम आणि त्यापुढे जाऊन भक्ती हे माणसाच्या जीवनाचे साध्य आहे हा या कादंबरीत सहजपणे आलेला विचार अत्यंत खुसखुशीत आणि खुमासदार पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न 'ढाई अक्षर प्रेम के' या नाटकात करण्यात आलेला आहे. जीवन विषयक तत्वज्ञान असले तरी छोट्या छोट्या उदाहरणांतून आणि मनोरंजक संवादातून हे नाटक आपल्याला विचार करायला लावणारं आहे.