मुंबई : संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला किंबहुना त्याआधीपासून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या रक्तामध्ये शिवबांनी स्वराज्याच्या रक्ताचा संचार केला होता. पुढे हाच धगधगता वणवा काही जाज्वल्य राजकीय नेतेमंडळींनी पुढे आणला आणि महाराष्ट्राती मान सातत्यानं उंचावलेली ठेवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं... असं म्हणत विरोधकांच्या नाकावर टिच्चून जनमत मिळवणारं एक नाव म्हणजे दिवंगत धर्मवीर आनंद दिघे. 



जेव्हा जेव्हा शिवसेनेचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा आनंद दिघे आणि त्यांच्या समर्थकांचाही उल्लेख होतो. 


आनंद दिघे... नावातच सगळंकाही आहे, असं या व्यक्तीमत्त्वाची ओळख सांगताना बोलणं अतिशयोक्ती ठरणार नाही. कोणासाठी धर्मवीर, कोणासाठी दानशूर नेता आणि कोणासाठी आपला जवळचा, हक्काचा माणूस अशीच आनंद दिघे यांची ओळख. 


राजकारण करताना त्यामध्ये कुठेच माणुसकी विसरून चालणार नाही आणि असं झाल्यास आनंद दिघे त्यांना सोडणार नाही, असा एक काळ महाराष्ट्रानं पाहिला. 


बाळासाहेब ठाकरेंच्या मर्जीतले आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असणारे आनंद दिघे कोण होते, ते आजही अनेकांसाठी पूजनीय का आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर' या चित्रपटाचा टीझर देत आहे. (Dharmaveer movie teaser)


अवघ्या काही मिनिटांमध्येच टीझरचा व्हिडीओ पाहताना आपण नकळतच गतकाळात निघून जातो आणि अनेक प्रश्न मनात घर करुन जातात. 


चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक यानं मध्यवर्ती भूमिका साकारल्याचं पाहायला मिळतं. याआधी तुम्ही आनंद दिघे यांचे फोटो अथवा व्हिडीओ पाहिलेले असल्यास प्रसादनं बऱ्याच अंशी धर्मवीर दिघेंच्या व्यक्तीमत्त्वाला न्याय देण्यासाठी केलेला प्रयत्न पाहून त्याचं कौतुक वाटतं.