Digpal Lanjekar's Mktaai Poster : महाराष्ट्रात ज्या स्त्री संत आपल्या कर्तृत्वाने अजरामर झाल्या त्यात ‘संत मुक्ताई’ यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संत मुक्ताईंच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी ‘मुक्तपणे मुक्त, ‘श्रेष्ठपणे श्रेष्ठ’, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई’।। असे वर्णन केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वाना परिचित आहेत. माऊलींप्रमाणेच त्यांचेही आयुर्मान तुलनेने तसे फारच कमी होते. मात्र, त्यांच्या हातून घडलेले कार्य हे सर्वार्थाने महान असेच ठरले. मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेचे सिद्ध जीवन होते. छोट्या आयुष्यात या जगन्मायेने संत कवयित्रींच्या काव्यानुभवांचा पाया रचला. स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. या ‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याविषयीची उत्सुकता वाढलेली आहे.



‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर आता, महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे आकर्षक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या छायेत बसलेल्या दिव्य मुक्ताई दिसून येत आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच जून 2024 मध्ये हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.


दिग्पाल लांजेकर लिखित ‘मुक्ताई’ या एकल नाट्याने 2016 ते 2020 या काळात प्रायोगिक नाटयक्षेत्र गाजवले. 2018 मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD), दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थिएटर ऑलिम्पिक्स मध्ये या नाटकाला सादरीकरणाचा विशेष सन्मान मिळाला होता.


हेही वाचा : Sam Bahadur Twitter Review: 'सॅम मानेकशॉ' यांच्या भूमिकेत विकी कौशलनं जिंकली प्रेक्षकांची मने, आनंद महिंद्रा म्हणाले...


आदिमायेचा अवतार मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनं त्या काळात स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून दिले. संत ज्ञानेश्वरांच्या भागवत धर्माच्या क्रांतीचा ती आधार बनली.  केवळ चौदा ते अठरा वर्षांच्या अल्प अवतार आयुष्यात मुक्ताईने शेकडो अभंग रचून स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या संत मुक्ताई यांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात.