`माहेरची साडी`च्या दिग्दर्शकाकडून नवीन चित्रपटाची घोषणा, नाव आणि रिलीज डेटही समोर
`ज्योती पिक्चर्स` निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.
Vijay Kondke New Movie Announce : मराठी चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीतील एक चित्रपट म्हणून 'माहेरची साडी'ला ओळखले जाते. 1991 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. हा चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षक भारावले होते. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केले होते. या चित्रपटानंतर तब्बल 34 वर्षांनी त्यांनी पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके यांचा 'माहेरची साडी' हा चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या 34 वर्षानंतर पुन्हा एकदा नवीन मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'लेक असावी तर अशी' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. येत्या 26 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ज्योती पिक्चर्स' निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.
आणखी वाचा : रणबीर-आलियाचे 'ड्रीम होम' तयार, बंगल्याला दिलं जाणार कपूर कुटुंबातील खास व्यक्तीचं नाव
'लेक असावी तर अशी' हा चित्रपट कौटुंबिक चित्रपट असणार आहे. या नवीन चित्रपटात कोण कलाकार असणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या चित्रपटाचे पोस्टर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती 'ज्योती पिक्चर्स'द्वारे केली जाणार आहे.
दरम्यान ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके हे दिवंगत मराठी चित्रपट अभिनेते दादा कोंडके यांचे पुतणे आहेत. विजय कोंडके यांनी दादा कोंडकेंच्या सोंगाड्या, पांडू हवालदार, बोट लावीन तिथं गुदगुल्या, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, आली अंगावर यांसारख्या अनेक चित्रपटांचे वितरण केले होते. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शक म्हणून त्यांची खास ओळख आहे.
निर्माते-वितरक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर कधीतरी दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून आपल्या मनातील चित्रपट बनवावा, अशी त्यांची इच्छा होती. त्याच इच्छेतून आणि दादा कोंडके यांनी दिलेल्या संधीमुळे मी ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचलले. या चित्रपटाने यशापलीकडे मला रसिकांचे अमाप प्रेमही मिळवून दिले. आता याच प्रेमापोटी 'लेक असावी तर अशी' हा नवीन मराठी चित्रपट 26 एप्रिलला प्रदर्शित होत आहे, असे विजय कोंडके यांनी म्हटले.