हैदराबाद : सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या एका निर्णयावर प्रश्नचिन्हं उपस्थित करत एका अभिनेत्याने लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. चित्रपटगृहांमध्ये सुरू असणाऱ्या राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहायला आपल्याला आवडत नसल्याचं मत दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण याने मांडलं आहे. २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याविषयी आदेश दिले होते, त्यावेळीसुद्धा पवन कल्याणने यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या, जन सेना या पक्षाच्या प्रमुखपदी असणाऱ्या कल्याणने आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधतेवेळी हे वक्तव्य केलं. 'चित्रपगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजतं तेव्हा उभं राहायला मला आवडत नाही. कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत एखादा चित्रपट पाहायला गेलेलं असताना आपल्याला राष्ट्रगीत सुरु झाल्यावर देशभक्तीची भावना दाखवावी लागते', असं म्हणत ही बाब योग्य नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. 



राजकीय पक्षांच्या सभा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत का लावलं जात नाही? फक्त चित्रपटगृहांमध्येच राष्ट्रगीत लावण्याचा अट्टहास का, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. 'देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा कामकाज पाहणाऱ्या कार्यालयांमध्येही राष्ट्रगीत लावण्यात यावं. जे कायदा बनवतात तेच कायद्याचं पालन करत आदर्श प्रस्थापित का करत नाहीत?', असा थेट प्रश्न त्याने उपस्थित केला. प्रत्येकाची देशप्रेमाची, देशभक्तीची परिभाषा ही वेगळीच असते असं म्हणत त्याने ठामपणे आपचं मत मांडलं. कल्याणच्या या वक्तव्याने काहींना विचार करण्यास भाग पाडलं तर, काहींचा रोष त्याने ओढावला. त्यामुळे आता पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावला जाण्याचा मुद्दा ओघाओघाने प्रकाशझोतात आला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याला राजकीय वळणही मिळत आहे.