मुंबई : माधुरी दीक्षित ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्तम स्टार्सपैकी एक आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. केवळ अभिनयच नाही तर तिने आपल्या डान्सने लोकांची मने जिंकली आहेत. माधुरी दीक्षित ही एकेकाळी सुपरस्टार हिरोईन होती आणि ती चित्रपटासाठी सर्वाधिक फी घेत असे. तिने वर्षानुवर्षे बॉलिवूडवर राज्य केलं आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, माधुरी दीक्षितने तिच्या करिअरची सुरुवात एका फ्लॉप चित्रपटातून केली होती. एवढंच नव्हेतर दूरदर्शननेही तिला नकार दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूरदर्शनने नाकारलं होतं
माधुरी दीक्षितला बॉलिवूडची 'धक धक गर्ल' म्हटलं जातं. चित्रपटांमध्ये येण्याआधी तिने छोट्या पडद्यावर आपलं नशीब आजमावलं होतं, पण तिला सुरुवातीला नकार देण्यात आला होता. बॉलिवूडच्या आधी माधुरी दीक्षितने 'बॉम्बे मेरी है' या दूरदर्शनच्या शोमध्ये काम केलं होतं. या शोचे पायलट भाग 1984 मध्ये शूट करण्यात आले होते, जे पॅनेलच्या तज्ञांना दाखवण्यात आले होते. मात्र एका भागानंतर दूरदर्शनने हा कार्यक्रम प्रसारित करण्यास नकार दिला.


नशिबाने साथ दिली नाही
दूरदर्शनने सांगितलं की, शोमध्ये प्रभावी स्टार कास्ट नाही. माधुरी दीक्षित या शोद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करणार होती, पण नशिबाने तिला साथ दिली नाही. बेंजामिन गिलानी आणि मजहर खान देखील या शोचा भाग होते. या शोचे दिग्दर्शन अनिल तेजानी यांनी केलं होतं.


फ्लॉप चित्रपटातून करिअरची सुरुवात केली
माधुरी दीक्षितची छोट्या पडद्यावरची कारकीर्द अयशस्वी ठरली, पण तिला त्याच वर्षी 'अबोध' नावाचा पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटातून माधुरी दीक्षितने आपल्या करिअरची सुरुवात केली, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. मात्र, त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यानंतर माधुरी दीक्षितने 'तेजाब', 'बेटा', 'राम लखन', 'हम आपके है कौन' आणि 'खलनायक' असे एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले. अशाप्रकारे माधुरी दीक्षित काही वेळातच बॉलिवूडची सुपरहिट हिरोईन बनली.