२०१७ एमा स्टोन साठी डबल सेलिब्रेशनचं !
यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराची मानकरी एमा स्टोन ही जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री ठरली आहे.
मुंबई : यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराची मानकरी एमा स्टोन ही जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्रीही ठरली आहे. जगभरात आपल्या अभिनय कौशल्याने दाद मिळवणारी ही अभिनेत्री यंदा अजून एका कारणामुळे प्रकाशझोतात आली आहे. यंदा एमाने कलाकारांना मानधानच्या बाबतीत होणारी तफावत ठळकपणे बोलून दाखवली. लिंग समानतेसाठी तिने विशेष प्रयत्न केले. पुरूष आणि स्त्री कलाकारांना समान मानधन मिळावे या मागणीसाठीही तिने आवाज उठवला होता.
२८ वर्षीय एमा स्टोन हीने गेल्या वर्षभरात २.६ कोटी डॉलर म्हणजेच १६६.४ कोटी रूपये कमावले आहेत. 'ला ला लॅन्ड' या चित्रपटात एमा झळकली होती.
सर्वाधिक कमाईच्या या यादीत २.५५ कोटी डॉलरची कमाई करून जेनिफर एनिस्टन दुसर्या क्रमांकावर आहे. प्रसिद्ध अमेरिकन टिव्ही सिरीज 'फ्रेन्ड्स' मधून जेनिफर जगभरात प्रसिद्ध झाली आहे. ड्रामा फिल्म 'द येलो बर्ड' यामध्येही जेनिफरने काम केले होते.
गेल्या दोन वर्षांपासून अव्वल स्थानी असणारी जेनिफर लॉरेन्स या यादीमध्ये यंदा तिसर्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षात तिने २.४ कोटी डॉलरची कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तिची कमाई निम्म्यावर आली आहे.