तुरुंगवासात काय-काय करावं लागलं? इतक्या वर्षांनी संजय दत्तने पहिल्यांदाच केला खुलासा
जवळपास चार दशकं हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या मुन्नाभाई अर्थात संजय दत्तचं वैयक्तिक आयुष्यदेखील एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. एक चुकी भोवली आणि संजय दत्तला पाच वर्षांचा तुरुंगवास घडला. तुरुंगात असताना काय केलं याचा खुलासा संजय दत्तने इतक्या वर्षांनी केला आहे.
Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांचं वैयक्तिक आयुष्य खूपच वादग्रस्त राहिलं आहे. चित्रपटांबरोबरच इतर गोष्टींसाठीही तो नेहमीच चर्चेत असतो. गेली चार दशकं संजय दत्तने हिंदी चित्रपटसृष्टी (Bollywood) गाजवली आहे. आजही संजय दत्तच्या (Sanjay Dutt) नावाची जादू चाहत्यांच्या मनावर आहे. हिरो असू दे की खलनायक संजय दत्त प्रत्येक भूमिकेत वरचढ ठरला आहे. 'केजीएफ 2' आणि 'समशेरा' सारख्या चित्रपटांनंतर संजय दत्त दाक्षिणात्या स्टार विजय थलापतीच्या 'लियो' (Leo) या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारतोय. या चित्रपटामुळे संजय दत्त सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान संजय दत्तने दिलेल्या एका मुलाखतीत तुरुंगात असताना काय केलं याचा खुलासा केला आहे.
काय होतं प्रकरण?
1993 बॉम्बब्लास्ट प्रकरणात शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तवर आरोप सिद्ध झाले आणि त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यातआली. त्याच्या राहात्या घरातून बेकायदेशीर ए.के. 56 रायफल हस्तगत करण्यात आली होती. 1994 साली अटकेपासून कोर्ट आणि तुरुंगांचे उंबरे झिजवलेल्या संजय दत्तची 2016 सालच्या फेब्रुवारी महिन्यात अखेर सुटका झाली. तीन वर्षांचा तुरुंगवास त्याने भोगला. पुण्यातील येरवडा जेलमध्ये तो बंद होता. या काळात काय-काय केलं याचा खुलासा संजय दत्तने इतक्या वर्षांनी केला आहे.
तुरुंगात काय केलं?
संजय दत्तने त्याकाळचा संपूर्ण घटनाक्रम आपल्या मुलाखतीत उलगडला. पहिल्यांदा जेव्हा ठाणे तुरुंगात गेलो तेव्हा सुनील शेट्टी, अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरु खान असे अनेक जण भेटण्यासाठी आले होते. दोषी ठरवण्यात आलं होतं, त्यामुळे तुरुंगवास निश्चित होता हे मनात पक्कं हकेलं होतं. ज्या समस्या येतील त्यांचा सामना करायचं असं ठरवलं. त्यामुळे तुरुंगात असताना ज्या चांगल्या गोष्टी शिकता येतील त्या शिकण्याचा प्रयत्न केल्याचं संजय दत्तने म्हटलंय.
तुरुंगात असताना वेळ घालवण्यासाठी कुकिंग शिकलो, धर्मग्रंथ वाचले आणि भरपूर वर्कआऊट केला असं संजय दत्तने म्हटलंय. तुरुंगातून जेव्हा केव्हा बाहेर येऊ तेव्हा तंदरुस्त असलं पाहिजे यासाठी स्वत:ला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला असं संजय दत्त यांनी म्हटलंय.
सामान्य कैद्याप्रमाणे वागणूक
संजय दत्तला इतर सामान्य कैद्याप्रमाणेच तुरुंगात वागणूक देण्यात येत होती. संजय दत्त 440 रुपये घेऊन तुरुंगातून बाहेर आला जे त्याने तिथे काम करताना कमावले. तुरुंगात संजय दत्तला कागदी पिशव्या बनवण्याचे काम देण्यात आलं होतं. तो तुरुंगातून बाहेर येईपर्यंत संजय दत्तने पंधराशे पिशव्या बनवल्या होत्या. संजय दत्तला दिवसाची मजुरी म्हणून फक्त 50 रुपये मिळत असत.