सुशांतचं अपूर्ण स्वप्न साकारण्यासाठी अखेर अंकितानं घेतला पुढाकार
हेच स्वप्न साकारण्यासाठी म्हणून .....
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत sushant singh rajput यानं साधारण दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली आणि साऱ्या कलाविश्वाला हादरा बसला. कारकिर्दीच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या अभिनेत्याची आत्महत्या अनेकांच्याच मनाला चटका लावून गेली. त्याच्या निधनामुळं उपस्थित झालेले काही अनुत्तरित प्रश्न पाहता सध्या सीबीआयकडून या प्रकरणीचा तपासही सुरु करण्यात आला आहे. त्यातच सुशांतचे चाहते आणि त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी मिळुन सध्या त्याचं एक अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत आहेत.
अभ्यासू वृत्तीचा सुशांत कायमच पर्यावरण, आकाशगंगा आणि अशा काही विषयांच्या कलानं त्याची अभिरुची दाखवत होता. जवळपास १००० रोपं लावण्याचं सुशांतचं स्वप्न. त्याचं हेच स्वप्न साकारण्यासाठी म्हणून अंकिताला रोपं खरेदी करताना पाहिलं गेलं. सुशांतचं स्वप्न साकार करण्यासाठीच आपण हे करत असल्याचं म्हणत तिनं चाहत्यांनाही यात हातभार लावण्याची विनंती केली आहे.
सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिनंसुद्धा मागील आठवड्यातच, #Plants4SSR अशी मोहिम राबवत शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं आवाहन केलं.
माध्यमांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंकितानं सुशांतच्या ५० स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून सर्वांनाही हीच विनंती केली आहे. सुशांतसोबतचं नातं आणि अंकिताच्या जीवनात त्याचं असणारं स्थान पाहता शक्य त्या सर्व परिंनी ती सुशांतप्रती कृतज्ञता आणि आपुलकीची भावना व्यक्त करताना दिसत आहे.