नवी दिल्ली : ग्रॅमी आणि सीएमए अवॉर्ड विजेते प्रसिद्ध अमेरिकी गायक जो डिफी (Joe Diffie) यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या जवळच्या लोकांनी फेसबुकवरुन त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. याआधी रविवारी जपानी कॉमेडियन केन शिमुरा यांचं निधन झालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या शुक्रवारी जो डिफी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. डिफी यांनी आठवड्यापूर्वी केलेल्या आपल्या एका विधानामध्ये, चाहत्यांना कोरोना व्हायरसच्या विळख्यात आपल्याला सर्वांना सतर्क आणि सावधान राहायला हवं असं, सांगितलं होतं. 



मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोनामुळे जॉर्जियामध्ये एक कार्यक्रमही डिफी यांनी रद्द केला होता. 1990 च्या काळात डिफी यांनी आपल्या गायनाने मोठी प्रसिद्धी मिळवली होती. 'होम', 'इफ द डेबिल डांस', 'थर्ड रॉक फ्रॉम द सन' आणि 'पिकअप मॅन' हे त्यांचे गाजलेले अल्बम आहेत.


फोटो सौजन्य : Twitter

अमेरिकेत कोरोनाचा कहर


अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची संख्या सर्वाधिक असून १२२,००० हून अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. अमेरिकेत मृतांची संख्या दोन हजारांपेक्षा अधिकवर पोहचली आहे. 


अमेरिका कोरोनामुळे प्रभावित असलेला जगातील सर्वात मोठा देश आहे. अमेरिकेत इटली आणि चीन पेक्षा अधिक रुग्ण आहेत. पण अमेरिकेत मृत्यूचं प्रमाण इटलीपेक्षा कमी आहे.


जगभरात कोरोाना रुग्णांची संख्या 6 लाख 60 हजारांवर गेली आहे. तर आतापर्यंत 30,000 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.